शिवाजी महाराजांबद्दलचे सरंक्षणमंत्र्यांचे ‘ते’ विधान चुकीच्या माहितीवर आधारित !
शिवाजी महाराजांबद्दलचे सरंक्षणमंत्र्यांचे ‘ते’ विधान चुकीच्या माहितीवर आधारित !
मुंबई दि. २८ ऑगस्ट :
केंद्रीय सरंक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या धक्कादायक विधानाचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी राजनाथसिंह यांनी चुकीच्या ऐकीव माहितीवर विधान केलेले असावे असे म्हटले आहे.
डाॅ. कोल्हे पुढे म्हणाले की, ऐतिहासिक कागदपत्रांचा धांडोळा घेतला तर सुरुवातीच्या स्वराज्याच्या निर्मितीत दादोजी कोंडदेव यांची नाराजी होती. आदिलशाहीच्या दरबारात शहाजी महाराजांना त्याचा त्रास तर होणार नाही ना अशी स्वामीनिष्ठा त्यापाठी होती. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट ही १६७१ च्या आसपास झाल्याचे काही ऐतिहासिक कागदपत्रे दाखवून देतात. त्यावेळी स्वराज्य पूर्णत्वास आलेले होते.
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रनायक ठरले ते रयतेसाठी निर्माण केलेल्या कल्याणकारी राज्यामुळे आणि त्या स्वराज्याला असलेल्या नैतिक अधिष्ठानामुळे. आपला जाज्वल्य इतिहास हा निःपक्षपातीपणाने, तर्कसंगत पद्धतीने,अकारण कुणाचेही स्तोम माजवून एकमेकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न टाळून राज्य, देश आणि जगभरात सांगण्याची गरज आहे असेही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.
दोन दिवसापूर्वीच एका हिंदी दिग्दर्शकाने मुघल शासक हे राष्ट्रनिर्माते आहेत असे सांगितले. त्यामुळे हा इतिहास सांगण्याची गरज आणखी प्रकर्षाने जाणवत आहे. केवळ निषेध किंवा एखादे आंदोलन हे क्षणिक ठरू शकते. मला वाटते ही वैचारिक लढाई आहे आणि ती त्याच माध्यमातून लढली गेली पाहिजे. साहित्य, कला याचा समाजमनावर दीर्घकालीन परिणाम होतो, त्या माध्यमातून आपण निःपक्षपाती, तर्कसंगत इतिहास जगभर पोहोचवला पाहिजे असेही खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
