महापालिकेच्या विभाग कार्यालयांतून नागरिकांचे समाधान होईल अशी सेवा मिळावी
महापालिकेच्या विभाग कार्यालयांतून नागरिकांचे समाधान होईल अशी सेवा मिळावी
BMC च्या ‘एच पश्चिम’ विभाग कार्यालयाच्या नव्या भव्य वास्तूचे लोकार्पण.
मुंबई, दि. ५ ऑगस्ट :
महानगरपालिका, शासकीय कार्यालये इत्यादी ठिकाणी आपापली कामे घेऊन येणारे नागरिक जरी कधी कपाळावर आठी घेऊन येत असले, तरी जाताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू असायला हवे. तरच आपल्या कामांचे आणि प्रयत्नांचे सार्थक झाले असे म्हणता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
ते आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एच पश्चिम’ विभागाच्या नवीन वास्तूच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी ‘कोविड’मध्ये नागरिकांची अव्याहतपणे सेवा करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगार – कर्मचारी -डॉक्टर – वैद्यकीय कर्मचारी व अधिकारी यांचे विशेष कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. अव्याहतपणे कार्यरत राहणार्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एच पश्चिम’ विभागाच्या नव्या वास्तूत आल्यानंतर आपण खरोखरच महापालिकेच्याच कार्यालयात आलो आहोत का? असा प्रश्न पडावा, इतकी ही वास्तू सुविधापूर्ण आणि प्रभावी झाली असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री म्हणाले की, सामान्य नागरिकांचे जन्म प्रमाणपत्रांच्या निमित्ताने महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांशी जन्मापासूनचे नाते असते. हे नाते आणखी दृढ होण्यास या सुविधापूर्ण कार्यालयांमुळे निश्चितच मदत होईल, असा विश्वासही त्यांनी कार्यक्रमादरम्यान व्यक्त केला. कोविड काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या अव्याहत कामांमुळे आज जगभरात ‘मुंबई मॉडेल’चा नावलौकिक आहे. अनेक गोष्टींची सुरुवात ही मुंबईत होते आणि मग जगभरात त्याचे अनुकरण केले जाते. आज लोकर्पित होत असलेली ‘एच पश्चिम’ विभाग कार्यालयाची वास्तू आणि या वास्तूतून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा या देखील अशाच अनुकरणीय ठरतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
कोरोना काळात आपण सर्वजण आता आरोग्याबाबत अधिक सजग झालो आहोत, असे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी नव्या वास्तूमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा असल्याच्या बाबीचा आवर्जून उल्लेख केला. तसेच महापालिकेच्या वास्तूत उभारण्यात आलेली ही पहिलीच व्यायामशाळा असल्याचेही मुख्यमंत्री महोदयांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले.
महापौर पेडणेकर यावेळी म्हणाल्या की, महापालिकेचे विभाग कार्यालय म्हटले तर ते आदर्श असायलाच हवे. आज लोकार्पण केलेले ‘एच पश्चिम’ विभाग कार्यालय बघितल्यानंतर हे कार्यालय आदर्शच असल्याची प्रचिती येते. याच प्रकारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आणखी ३ विभाग कार्यालयांच्या नूतन वास्तू उभारणे आवश्यक असून यामध्ये ‘जी दक्षिण’ विभाग, ‘आर उत्तर’ विभाग आणि ‘ए’ विभागाचा समावेश आहे. यासाठी पर्यायी जागेत सदर विभागाचे स्थलांतर करून हे काम महापालिका प्रशासनाने तातडीने सुरू करावे, असे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.
याप्रसंगी महापौर पुढे म्हणाल्या की, बृहन्मुंबई महानगरपालिकेची वरळी येथील अभियांत्रिकी संकुलाची इमारत बघितल्यानंतर आपण कुठल्या खासगी संस्थेच्या कार्यालयात आलो आहे का? असं क्षणभर वाटेल; अशी अप्रतिम आणि नीटनेटके ही वास्तू आहे. त्याच प्रमाणे आज लोकार्पित झालेल्या ‘एच पश्चिम’ विभाग कार्यालयात प्रवेश केल्यानंतर नागरिकांना ‘हेल्प कियाॅस्क’ द्वारे त्यांच्या कामाबाबत मार्गदर्शन केली जाईल. त्याचबरोबर नागरिकांना आपली ‘फाईल’ आणि आपल्या कामाचा ‘फॉलोअप’ देखील ‘हेल्प कियाॅस्क’ द्वारे कळेल. जेणेकरून त्याला प्रत्येक व्यक्तीकडे जाण्याची गरज राहणार नाही. ‘हेल्प कियाॅस्क’ ही संकल्पना योग्य प्रकारे अंमलात आणल्या बद्दल महापौर महोदयांनी ‘एच पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांचे कौतुक केले. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाची वास्तू उभारताना एक मॉडेल निर्धारित करून त्या पद्धतीने इतर सर्व विभाग कार्यालयाची निर्मिती करावी, असे निर्देशही महापौर महोदयांनी दिले.
आज झालेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांना संबोधित करताना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल यांनी मुख्यमंत्री महोदय हे त्यांच्या अत्यंत व्यग्र दिनक्रमातून वेळ काढून या कार्यक्रमाला आल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे सर्वप्रथम आभार मानले. तसेच मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आज लोकार्पित होत असलेल्या ‘एच पश्चिम’ विभागाच्या नव्या भव्य वास्तुच्या ठळक वैशिष्ट्यांची आणि या वास्तूत उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सेवा-सुविधांची माहितीही महापालिका आयुक्तांनी उपस्थितांना दिली.
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘एच पश्चिम’ विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. विनायक विसपुते यांनी केले. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘एच पश्चिम’ विभागाच्या नवीन सुविधापूर्ण कार्यालयाबद्दल नेटकी माहिती देणारा माहितीपट उपस्थितांना दाखविण्यात आला.
