ऑक्सीजन बाबतीत स्वयंपूर्ण झालेच पाहिजे !
ऑक्सीजन बाबतीत स्वयंपूर्ण झालेच पाहिजे !
मुंबई, पुणे क्षेत्रातील पालिका आयुक्तांना मुख्यमंत्र्यांच्या महत्वपूर्ण सुचना.
मुंबई , दि १ मे :
कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर कोविड संसर्ग आढळण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी बोलून दाखविली असून प्रशासनाने त्याबाबत आगाऊ नियोजन करून ठेवावे. प्रत्येक पालिका क्षेत्रात येणाऱ्या काही दिवसांत ऑक्सिजन सुविधा उपलब्ध झालीच पाहिजे आणि यासाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडली नाही पाहिजे स्पष्ट सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत .
मुख्यमंत्र्यांनी आज मुंबई, मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व महानगरपालिका, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांशी दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन कोविडसंदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेतला त्याचप्रमाणे संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील कोविडचा मुकाबला करतांना इतर रोगांच्या रुग्णांना सुद्धा वेळीच उपचार मिळणे अतिशय गरजेचे आहे. पावसाळ्यात हिवताप, कॉलरा, कावीळ, लॅपटो, डेंग्यू तसेच इतर साथीचे आजारही पसरतात, कोविडवर उपचार करतांना या नॉन कोविड रुग्णांसाठी सुद्धा कोविडपासून वेगळी स्वतंत्र व्यवस्था असावी.
पहिल्या लाटेमध्ये विशेषत: ज्येष्ठ आणि वयस्कर नागरिकांमध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळला तर या दुसऱ्या लाटेत ३० ते ५० वयोगटात प्रमाण जास्त दिसते एवढेच नाही तर लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसतोय. येणाऱ्या संभाव्य लाटेत हे प्रमाण आणखी वाढले तर आपली पूर्ण व्यवस्था हवी त्याचे नियोजन करून ठेवा व रुग्णालयांतील लहान मुलांचे उपचार कक्ष सुसज्ज ठेवा असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सध्या बऱ्याच पालिका क्षेत्रात रुग्ण संख्या स्थिरावलेली दिसते. धोका टळलेला नाही पण येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ऑक्सिजनच्या बाबतीत प्रत्येक पालिका आत्मनिर्भर झालीच पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजनसाठी इतर कुणावरही अवलंबून राहता कामा नये, औषधांचा साठा, व्हेंटीलेटर्स पुरेशा संख्येने आहेत याची खात्री करून घ्यावी असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
यावेळी टास्क फोर्सचे डॉ शशांक जोशी यांनी सौम्य व लक्षणविरहित रुग्णांची प्रकृती अचानक ढासळत जाणे, रुग्णालयात उशिरा दाखल करणे यामुळे मृत्यू दर वाढल्याचे सांगून रेमडीसीव्हीर, स्टीरॉइडसचा वापर, प्लाझ्माची नेमकी उपयुक्तता, विशेषत: रात्रीच्या वेळी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने यावेळी रुग्णालयात रुग्णांच्या प्रकृतीकडे अधिक लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले.
