फडणवीस, दरेकर ‘त्या’ कंपनी मालकाची वकिली का करत आहेत ?
फडणवीस, दरेकर ‘त्या’ कंपनीच्या मालकाची वकिली का करत आहेत ?
रेमडेसीवीर कंपनीच्या ‘त्या’ मालकाशी भाजपाचे काय संबंध ?
मुंबई, दि. 18 एप्रिल :
रेमडेसीवीर वरून मुंबईत मध्यरात्री झालेल्या हाय होल्टेज ड्राम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकार वर गंभीर आरोप केले. पोलीसांनी ब्रुक फा र्मा कंपनीच्या संचालकाला ताब्यात घेतल्यावरून पोलिसांनाही जाब विचारला.भाजपा नेत्यांच्या या कृतीवर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी जोरदार आक्षेप घेत फडणवीस व दरेकर यांचा समाचार घेतला.
नवाब मलिक म्हणाले, ‘पोलीस यंत्रणा काळा बाजार रोखण्यासाठी काम करत आहे मग ब्रुक फार्माच्या डोकानियाला बोलावल्यानंतर संपूर्ण राज्यातील भाजपा का घाबरते? सगळा भाजपा वकिलीसाठी का गेला ? फडणवीस डोकानियाचे वकीलपत्र घेऊन बाजू मांडत होते की त्यांचे संबंध आहेत म्हणून मांडत होते ? जर महाराष्ट्राच्या हितासाठी पोलीस यंत्रणा, एफडीए काम करत असेल आणि चौकशीसाठी बोलावले असेल तर भाजपाचे नेते तिकडे जातात यावरुन काय संबंध आहेत हा खुलासा केला पाहिजे.
डोकानियाला सोडवण्यासाठी राज्याचे दोन-दोन विरोधी पक्षनेते आणि आमदार का गेले ? राज्यात कुठेतरी भाजपाची लोकं साठा मिळणार नाही यासाठी प्रयत्न करत आहेत. जो साठा आहे तो विकत घेऊन आपण विकू ही भूमिका घेत आहेत. साठा देऊ शकतात त्यांना ऑर्डर द्या अशी भूमिका घेत आहेत. पण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर जेव्हा एखाद्या व्यक्तीला बोलावल्यानंतर हे नेते का जातात, अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली आहे.
रेमडेसीवीरचा ५० हजारांचा साठा आम्ही वाटणार आहे असे सांगता आणि सरकार मागते तेव्हा ते लोक देत नाहीत. त्यांच्या मागे काय राजकारण आहे हे भाजपाने स्पष्ट केलं पाहिजे. ज्यांनी साठा ठेवला त्यांना चौकशीसाठी बोलावलं आणि नंतर भाजपा नेते वकिलीसाठी पोलीस ठाण्यात जातात हे योग्य नाही. विरोधी पक्षनेता फोनवरुन माहिती घेऊ शकतो, वरिष्ठांशी चर्चा होऊ शकते. पोलीस ठाण्यात जाऊन वकिली करणे हे काय राजकारण आहे ?
ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया हे स्वत: अन्न न औषध मंत्री शिंगणे आणि प्रवीण दरेकर यांना भेटले. माझ्याकडे साठा आहे, परवानगी दिली तर हा साठा देऊ शकतो अशी माहिती दिली. पोलिसांना निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडे औषधांचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर राजेश डोकानिया यांना बोलावून माहिती गोळी केली जात होती, असे नवाब मलिक यांनी सांगितलं.
