संजय राऊतांच्या आरोपाला चंद्रकांतदादांचे सणसणीत उत्तर!
मुंबई, दि. ६ जुलै २०२
महाविकास आघाडी सरकार ऑक्टोबरपर्यंत पाडण्याचा भारतीय जनता पक्ष प्रयत्न करत आहे या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी उत्तर दिले आहे. तिन्ही पक्षांच्या अंतर्गत चाललेल्या भांडणावरून सरकार पडण्याची भीती तुम्हाला वाटत आहे पण ते भाजपाच्या नावावर खपवत आहात, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.
संजय राऊतांचा समाचार घेताना चंद्रकांतदादा पुढे म्हणाले की, कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्र अडकला आहे त्यापेक्षा तुम्हाला भाजपावर खोटे आरोप करणे महत्वाचे वाटते का? सरकार पडण्याचा मुद्दा जास्त महत्वाचा वाटतो का? दिवसेंदिवस महाराष्ट्रात कोरोना त्याचे पाश आणखी घट्ट आवळत चालला आहे, कोरोनामध्ये होणारा मृत्युदर वाढतोय. राज्य सरकारचा प्रत्येक प्रयत्न हा गेल्या तीन महिन्यांपासून दिशाहीन असल्याचे संपूर्ण देशाला माहित आहे. तुमच्या सरकारी कार्यकाळात पोलीस, डॉक्टर, परिचारिका, सफाईकर्मचारी देखील असुरक्षित आहेत.शेतकऱ्यांची बियाणं आणि पुढच्या हंगामातील कर्जाची समस्या तुम्हाला सोडवावी वाटत नाही. या सर्व चुकांचे आत्मपरीक्षण करून त्या सुधारायच्या सोडून भाजपावर निष्फळ आरोप करत आहात.
शिवसेनेच्या हातात मागील अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिका आहे परंतु दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबई पहिल्या पावसात तुंबली आहे.पूर्ण शहर गेले तीन महिने रिकामे होते, योग्य नियोजन करून पावसाळ्याच्या आधी सर्व कामे तुम्ही करू शकला असता पण तसे तुम्ही केले नाही परिणामी मुंबई पुन्हा तुंबली आणि कोरोनाच्या संकटात आता नागरिकांच्या संकटात आणखी वाढ झाली आहे.
या सर्वांबद्दल सामना नेहमीच गप्प असतो. फक्त केंद्र सरकारच्या चीन विरुद्धच्या कारवाईं वर मनाला येईल तशी टीका करणं आणि भाजपा हे सरकार पाडू बघत आहे अशी विधाने करणे एवढेच वाचायला मिळते. मी मांडलेल्या सगळ्या समस्यांच्या उपाययोजनांवर कधी बोलणार राऊत ? सत्तेच्या मोहात तुम्हाला जनतेचे प्रश्न दिसत नाहीत. तुम्ही राज्य शासनाचे अपयश हे भाजपा वर आरोप करून लपवू शकत नाही. जनता सुजाण आहे. शेवटी तीच ठरवेल भविष्य, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले आहे.
