गुरुपौर्णिमा विशेष – श्री स्वामी समर्थ अक्कलकोट !
मुंबई, दि. ५ जुलै २०२०
गुरुपौर्णिमा….या दिवसाचे महत्व ओळखून अनेकांचा शिर्डीचे साईबाबा, गाणगापूरचे दत्तगुरु, नृसिंहवाडी येथे जाऊन श्रींचे दर्शन घेण्याचा प्रघात असतो. आज आपण अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल थोडेसे जाणून घेऊयात.
अक्कलकोट स्वामी समर्थ हे दत्ताचे चौथे अवतार आहेत असे भाविकांची श्रद्धा आहे. स्वामी महाराज अक्कलकोट गावी पहिल्यांदा आले त्यावेळी खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर बसले त्यानंतर त्यांनी वटवृक्षाखाली साधना केली. १८५६ मध्ये स्वामी अक्कलकोटमध्ये आल्याचे संदर्भ मिळतात. अक्कलकोटमध्ये त्यांनी २२ वर्ष वास्तव्य केले आणि शेवटी समाधी घेतली असे सांगितले जाते…त्यांच्या दर्शनाने एक आत्मिक समाधान लाभते हेच स्वामी समर्थांच्या दर्शनाचे महात्म्य..
अक्कलकोट स्वामी महाराचांच्या शिष्यांची संख्या अफाट आहे. मुंबई, आपसपासच्या परिसरातही स्वामींचे मठ आहेत, त्यात नित्यनेमाने पूजा केली जाते. स्वामींचे लाखो भक्त अक्कलकोटला जाऊन दर्शनाचा लाभ घेतात. तुम्हालाही अक्कलकोटला जाऊन समर्थांचे दर्शन घ्यायचे घाटत असेल तर तो विचार कसला करता, चला निघा अक्कलकोटला.. अक्कलकोटला जाण्यासाठी विशेष तिथीची किंवा सण-उत्सवाची गरज नाही. तुम्ही बारा महिने कोणत्याही दिवशी दर्शनासाठी जाऊ शकता.. गुरुवार हा स्वामींचा दिवस ते दत्ताचे अवतार.. त्यामुळे गुरुवार, दत्तजयंती, प्रकट दिन, गुरुपौर्णिमा असे काही दिवस भाविकांचा ओघ इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणात असतो… पण तरिही त्या दिवशी जायचा योग जुळून आला तरी नक्की जा…
अक्कलकोट हे सोलापूर शहरापासून ४०-४५ किलोमिटर अंतरावर आहे. सोलापूरातून एस टी महामंडळाच्या बसची व्यवस्था चांगली असून दर पंधरा मिनिटाला अक्कलकोटसाठी एसटीची सोय आहे. त्यामुळे तासात तुम्ही अक्कलकोटला पोहचू शकता..एसटी स्टँडवरुन स्वामींचे मंदिर फार दूर नाही. इतर मंदिरासारखे स्वामींचे हे मंदिर लांबून दिसत नाही..समर्थांचे मंदिर म्हणजे एक मोठा वाडा आहे. आत गेल्यानंतर एक वटवृक्ष आहे. स्वामींना वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज असेही म्हटले जाते. या वटवृक्षालाही महत्व आहे. दत्त अवतारातल्या मंदिरात वटवृक्ष हा आवर्जून आढळतो. मंदिरात तुम्हाला शांतता जाणवते…
स्वामी समर्थांच्या मंदिराशेजारी इतर देवस्थानाच्या ठिकाणी असतो तसा बाजार नाही.. अगदी मोजकीच छोटी टपरीवजा दुकाने..पूजेचे साहित्य आणि स्वामी समर्थांविषयी माहिती देणारी पुस्तके, सीडी, माळा, फोटो, प्रसाद एवढाच काय तो बाजार..विशेष म्हणजे समर्थांच्या दर्शनासाठी कोणत्याही दलालाची गरज नाही. दर्शनासाठी कुठलाही पास लागत नाही. कोणीही यावे आणि समर्थांचे दर्शन घ्यावे.
मंदिरापासून जवळच स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आहे. या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो..महाप्रसादाचा हा आस्वाद जरूर घ्या..साध्या स्वच्छ महाप्रसादाचे चार घासही तुम्हाला तृप्तीची ढेकर देऊन जातील..महाप्रसाद सकाळ-संध्याकाळ मिळतो.. विशेषतः सकाळी नऊनंतर दुपारी दोन वाजेपर्यंत आणि नंतर संध्याकाळी सहा-सातनंतर नऊ वाजेपर्यंत.
तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल किंवा नसाल तरीही एकदा अक्कलकोटला जाऊन समर्थांचे दर्शन जरुर घ्या. काही कामानिमित्त किंवा लग्नाच्या निमित्ताने सोलापूरला भेट होत असेल तर नियजोन करा आणि स्वामी समर्थांचे दर्शन घ्या…
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!
