चंद्रकांतदादांच्या टीममध्ये खडसे, तावडे, मेहता १२ वे खेळाडू!
मुंबई : ४ जुलै २०२०
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रदेश पदाधिकारी व प्रदेश कार्यकारणीची घोषणा केली आहे. या कार्यकारणीत तरूण चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र व सामाजिक विभाग लक्षात घेऊन सर्व विभागांना प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. ३३ टक्के महिला प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला असून जातीय समिकरणाचा विचारही करण्यात आला आहे.
चंद्रकांतदादांच्या टीममध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे विनोद तावडे, प्रकाश मेहता यांनाही डावलले असून विशेष निमंत्रित या पदावर त्यांची बोळवण करण्यात आली आहे. याचा अर्थ तुम्ही मागच्या खुर्चीत बसा, तुम्ही बारावे खेळाडू! तर पंकजा मुंडे यांना केंद्रीय पातळीवर जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सांगून त्यांना राज्याच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. सातत्याने पक्षावर टीका करणाऱ्यांची दखल घेतली जात नाही असा संदेशही यातून दिल्याचे दिसते. चंद्रशेखर बावनकुळे यांना सरचिटणीस बनवण्यात आले आहे. तर राष्ट्रवादीमधून आलेल्या चित्रा वाघ यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे. केशव उपाध्ये यांना मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर माधव भंडारी यांना उपाध्यक्ष करण्यात आलेले आहे. कोथरुडचे विधानसभा उमेदवारीचा पत्ता कट केल्यामुळे नाराज झालेल्या मेधा कुलकर्णी यांची सदस्य पदावर बोळवण करण्यात आली आहे.
