Pandharpur wari

पंढरपूर, दि. १ जुलै २०२०

महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विठ्ठल चरणी घातले.

आषाढी एकदशीसाठी फुलांनी सजवलेली विठ्ठल मर्ती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्यमंत्र्यांचा सपत्नीक सत्कार मंदिरे समितीचे कार्यकारी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला  माऊलींच्या दर्शनाला आलो. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास बळ द्यावे, अशी मागणी विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढरपुरात येऊ नये, घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन  ठाकरे यांनी भाविकांना केले. वारकरी सांप्रदायाने शासनाच्या वतीने वेळोवळी करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

मानाचा वारकरी

श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजता सुरू झाली. यंदाचे मानाचे वारकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि सौ. अनुसया बढे या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री व पत्नी रश्मी ठाकरे यांनी केली. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, श्री. तेजस ठाकरे उपस्थित होते. तसेच नगराध्यक्ष साधना भोसले, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, शिवाजीराव मोरे, माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे,  विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र भोसले, पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *