शहीद जवान सुनील काळेंच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी!
सोलापूर, दि.२७ जून २०२०
अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या सुनिल काळे यांच्या कुटुंबातील एकाला शिक्षणानुसार शासकीय सेवेत घेण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या मंत्री महोदयांनी पानगाव (ता. बार्शी) येथे शहीद काळे यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. शहीद काळे यांची भाची वर्षा काळे यांनी कुटुंबाची माहिती दिली. काळे कुटुंबीय जिरायती शेतीवर अवलंबून आहे. मामीला आधार देण्यासाठी कोणी नाही, एकाला शासकीय सेवेत घेण्याची तिने मागणी केली होती.
यावर देशमुख म्हणाले, आम्हाला शहीद काळे यांचा अभिमान आहे. शासन खंबीरपणे कुटुंबाच्या पाठिशी आहे. तर वीर जवानाचा आम्हाला अभिमान असून काळे कुटुंबाला लागेल ती मदत शासन करेल, असे भरणे यांनी आश्वस्त केले. शासकीय मदतीबरोबर खास बाब म्हणून काळे कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत घेण्याचा प्रयत्न शासन करेल. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
