रूग्णालयाबाहेर झालेले मुंबईतील १००० मृत्यू दडवले?

0
dev fadnavis

रूग्णालयाबाहेर झालेले मुंबईतील १००० मृत्यू दडवले?

मुंबई, दि. २६ जून २०२०

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आकडेवारीवरून सरकार व विरोधात यांच्यात जुंपली आहे. सरकार ही आकडेवारी दडवत असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा या विषयावर सरकारला जाब विचारला आहे. रूग्णालयाबाहेर झालेले पण विविध प्राधिकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले सुमारे एक हजार मृत्यू अजून अधिकृत आकडेवारीत दाखविण्यात आलेले नाहीत,असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

यासंदर्भात फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, मुंबईत ज्या रूग्णांचा मृत्यू रूग्णालयाबाहेर झालेला आहे, असे मृत्यू अद्यापही दाखविण्यात आलेले नाहीत. या मृत्यूंच्या बाबतीत वॉर्ड अधिकारी किंवा तत्सम प्राधीकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले आहे, अशांचा आकडा अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या तीन-साडेतीन महिन्यात असे किमान एक हजार मृत्यू मुंबईत आहेत, ज्यांना अजूनही रेकॉर्डवर घेण्यात आलेले नाही. प्राथमिक संकलनातच आतापर्यंत किमान ४५० मृत्यू ओळखण्यात आलेले आहेत. एकूणच मृत्यूच्या संख्येत एकतर त्याचदिवशी किंवा फार तर 72 तासांत तशी नोंद होणे आवश्यक आहे. परंतू तीन महिने लोटले तरी मृत्यू रिपोर्ट न होता आणि ते लक्षात आल्यानंतर सुद्धा एकदम संख्या दिसू नये, या भीतीने रोज थोडे-थोडे करून ते मृत्यूसंख्येत अधिक करणे, ही अतिशय चुकीची रणनीती आहे.

मुळात कोरोनाविरूद्धच्या लढाईत कोणत्या आठवड्यात किती मृत्यू झाले, किती रूग्णसंख्या आढळली, म्हणजे संसर्ग (इन्फेक्शन) किती प्रमाणात झाले आहे, हे कळण्यासाठी आकडेवारी हा अतिशय महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. अचूक विश्लेषणाचा तो महत्त्वपूर्ण आधार आहे. या विश्लेषणातूनच आणि रणनीती आखून त्याला पायबंद घालणे शक्य आहे. त्यामुळे नोंदी अचूक ठेवण्याचा आग्रह सातत्याने असला पाहिजे. त्यादिशेने योग्य त्या सूचना संबंधितांना द्या असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

असेच एक पत्र यापूर्वी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना १५ जून रोजी पाठविले होते. सुमारे ९५० मृत्यू कोरोनामुळे झालेले असताना सुद्धा ते त्यावेळी दाखविण्यात आलेले नव्हते. त्यानंतर १६ जूनला मुंबईत ८६८ आणि मुंबईसह राज्यात एकूण १३२८ मृत्यू अधिकचे दाखविण्यात आले. मुंबईत या ८६८ च्या व्यतिरिक्त सुमारे ३५० जुने मृत्यू दरम्यानच्या काळात अधिक करण्यात आले. म्हणजेच असे एकूण १२०० हून अधिक मृत्यू एकट्या मुंबईतील जुने परंतु नंतर दाखविण्यात आले ते अशाच प्रकारात मोडणारी ही दुसरी बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *