एक वर्षापूर्वी पहाटे महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ झाला…..

0
20201124_103132

एक वर्षापूर्वी पहाटे महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ झाला…..

‘लव्ह जिहाद’ वरून शिवसेनेचा भाजपावर हल्ला !

मुंबई, दि. 24 नोव्हेंबर :
भारतीय जनता पार्टीने लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित करून यासंदर्भात कायदा करण्याची मागणी केली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश मध्ये तशी घोषणा करण्यात आली आहे आणि महाराष्ट्रातही तसा कायदा करावा अशी मागणी भाजपाने करून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र लव्ह जिहाद वरून शिवसेनेने भाजपा चा समाचार घेतला.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, ‘लव्ह जिहादच्या विषयावर बांग देऊन महाराष्ट्रातील सरकारला हादरे देऊ, या भ्रमातून भाजपवाल्यांनी बाहेर पडावे. एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला. तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले व टिकले. ते टिकणारच आहे.

‘लव्ह जिहाद’ची चर्चा सध्या देशात नव्यानं सुरू झाली आहे. मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश सरकारनं या संदर्भात कायदे करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनंही ‘लव्ह जिहाद’चा कायदा करावा, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचं सरकार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी हे सेक्युलर पक्ष म्हणून ओळखले जातात. ते अशा कायद्याला पाठिंबा देणार नाहीत हे माहीत असल्यानं शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजप ही मागणी करत असल्याचं बोललं जातंय.

‘भाजपला हिंदुत्वाचा घोर लागून राहिला आहे. लव्ह जिहाद हे त्यांचे नवीन हत्यार आहे. प. बंगाल निवडणुकांनंतर ते हत्यारही भंगारात जाईल. आता उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरयाणा या भाजप शासित राज्यांत लव्ह जिहादविरोधी कायदे करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण कायद्यापेक्षा या प्रश्नी बोंबलण्याचीच उकळ जास्त फुटली आहे.

‘भाजपच्या व्याख्येनुसार महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ची कधी व किती प्रकरणं घडली आहेत, ते समोर आणावं. उगाच नसलेली थडगी उकरून काढून राज्यातील सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न करू नये. लव्ह जिहाद हा विषय शिवरायांच्या महाराष्ट्रात रुजू शकत नाही. येथे शिवसेनेचा हिंदुत्ववाद कायम आहे. आमचे हिंदुत्व म्हणजे खोमेनी छाप धार्मिक उन्माद व त्यावर तरारलेले राजकारण नाही,’ असेही शिवसेनेने म्हटले आहे.

कश्मिरात पाकनिष्ठ, ३७० कलमप्रेमी मेहबुबा मुफ्तींशी भाजपने सत्तेचा निकाह लावला हा सुद्धा वैचारिक लव्ह जिहादचाच प्रकार का मानू नये? संघमुक्त, मोदीमुक्त भारताचा डंका पिटणाऱ्या नितीश कुमार यांना पुन्हा कडेवर घेऊन सत्तेचा निकाह लावला हा सुद्धा लव्ह जिहादचाच प्रकार का मानू नये?,’ असे प्रश्नही शिवसेनेने उपस्थित केले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *