कार्तिक वारीसाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन द्या.

0
IMG-20201118-WA0047

 

मर्यादित संख्येतील वारक-यांच्या उपस्थितीत वारी पार पाडावी..

मुंबई दि १८ नोव्हेंबर:

राज्याला शेकडो वर्षांची संत परंपरा लाभली आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक समतेचा संदेश देणा-या वारकरी संप्रदायास परंपरेनुसार वारी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे दायित्व आहे. 24 नोव्हेंबरच्या कार्तिकी वारीसाठी कायदा आणि सुरक्षेसाठी शासन योग्य ते नियोजन करेल. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार मर्यादित संख्येतील वारक-यांच्या उपस्थितीत ही वारी परंपरा यशस्वी व्हावी असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

 

वारीदरम्यान येणा-या समस्या आणि कोरोना पार्श्वभूमीवर वारीचे नियोजन करण्यासंदर्भात विधानभवनामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विविध समस्या जाणून वारकरी बांधवांना सर्व सोयीसुविधा उपलबध व्हाव्यात यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

या बैठकीस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, बांधकाम विभागाचे सचिव अ. ब. गायकवाड, ऊर्जा विभागाचे उपसचिव प्र. पु. बडगेरी, नगरविकास विभागाचे उपसचिव स.ज. मोघे, एस. टी. महामंडळाचे महाव्यवस्थापक संजय सुपेकर, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, कार्याध्यक्ष माधव शिवणीकर, विश्वस्थ श्रीकांत महाराज ठाकूर, ज्ञानेश्वर तुळशिदास महाराज, नामदेव महाराज चौधरी, समस्त वारकरी फंड दिंडी समाजाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जळगांवकर, आदिसह वारकरी परिषद संस्थान यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, कोरोना महामारिच्या पार्श्वभूमीवर यंदा २४ नोव्हेंबरला होणारी पंढरपूर कार्तिकी वारी आणि 11 डिसेंबरला होणारी आळंदी वारी ही किमान वारक-यांच्या उपस्थितीत पार पाडावी, याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. वारीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासन आवश्यक ती उपाययोजना करेल. तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत वारक-यांच्या पालख्यांसाठी एकूण ३४ विश्रांतीस्थळांना कायमस्वरुपी जागा मिळावी, त्‍यासाठी सर्व्हे करून जागा उपलब्ध करून देण्यात यावी असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिका-यांना दिले.

ज्या मार्गांवरून पालखी जाते, त्या रस्त्यांची डागडुजी विविध शासकीय रस्ते बांधणी योजनेअंतर्गत पूर्ण करावी, दरवर्षी होणाऱ्या वारी व अन्य कार्यक्रमांसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधिन राहून हे कार्यक्रम चंद्रभागेच्या वाळवंटातच होतील यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देशही पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

वारीला जाण्यासाठी फड परंपरेच्या दिंड्यांसाठी वारक-यांशी समन्वय साधून त्यांना एस. टी. महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देण्याचे निर्देशही अध्यक्ष पटोले यांनी संबंधित अधिका-यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *