यंदाही बाप्पाचे आगमन होणारच, पण …..असे !
मुंबई दि.१८ जून २०२०
यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांना केले आहे.
पुणे तसेच इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे, याबद्दल तसेच शासन जो निर्णय घेईल त्यास पूर्णपणे पाठिंबा आहे अशी ग्वाही गणेश मंडळांनी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद दिले. शिर्डी, सिद्धिविनायक व यासारख्या संस्था तसेच गणेश मंडळांनी देखील मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जी मदत केली तसेच सामाजिक उपक्रम राबवले त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद दिले.
बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, हे खरे आहे की नेहमीप्रमाणे यंदा हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही.कोरोनाचा धोका संपलेला नाही, गर्दी करता येणार नाही, मिरवणूका काढता येणार नाहीत. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता, योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल. ही साधेपणाची चौकट सर्वांना ठरवावी लागेल. आपण महाराष्ट्रात पुनःश्च हरिओम करीत आहोत. प्रत्येक पाऊल हे सावधतेने टाकत आहोत. त्यामुळे हा उत्सव साजरा करताना देखील आपल्याला चौकटीत राहूनच साजरा करावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत परंपरा खंडित होणार नाही याची काळजी घेऊन उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवावेच लागेल.
पुण्यातील गणेश मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे ठरवले आहे त्याचे स्वागत आहे. या निर्णयाचे सर्वांनी अनुकरण करावे व त्याचे पालन करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या वारीने देखील शासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद दिला. पुढील काळात आषाढी, दहिहंडी, स्वातंत्र्य दिन असे महत्त्वाचे सण-उत्सव आहेत, हे सण उत्सव साजरे करताना उत्साह कायम ठेवा व घरात थांबूनच ते साजरे करावेत.
