बॉलीवूडला संपविण्याचा डाव सहन करणार नाही!
मुंबई, दि. 15 ऑक्टोबर:
बॉलीवूडला गेल्या काही दिवसांपासून ठराविक वर्गाकडून बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत’, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिला आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. आज हॉलीवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बॉलीवूडमध्ये बनत आहे. या बॉलीवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे. सिनेमासृष्टी हा एक मोठे मनोरंजन उद्योग क्षेत्र असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात.
करोना संसर्गामुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सात महिन्यांपासून बंद असून आहेत. आता अनेक निर्बंध शिथील होत असताना सिनेमागृहांची दारेही लवकरच उघडणार आहेत. या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे मालकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी गेल्या काही दिवसांतील घटनाक्रमाकडे बोट दाखवत एकप्रकारे बॉलीवूडला सावध करण्याचे काम केले.
