‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ लोकचळवळ व्हावी!
मुंबई, दि. 14 ऑक्टोबर :
‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ आणि ‘गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’ या विचाराचे एका लोकचळवळीत रुपांतर व्हावे; अशी अपेक्षा व्यक्त करतानाच राज्यातील जनतेच्या पर्यायाने महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी सर्व यंत्रणांनी नियोजनबद्ध काम करावे, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.
मेळघाटातील बांबू लागवडीतून मोठे उत्पन्न मिळविणाऱ्या राहू गावाचा विशेष उल्लेख करुन ॲड. ठाकूर म्हणाल्या की, एक गाव अशा पद्धतीने आपली प्रगती करु शकत असेल तर इतर गावे ही नक्कीच आपल्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग केल्यास समृद्ध होऊ शकतील. यासाठी स्थानिक परिस्थिती, हवामान आणि क्षमतांचा विचार करुन पिके निवडली पाहिजेत. त्यासाठी रोजगार हमी योजना, कृषी विभाग आदी विभागांनी समन्वयाने काम करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि आवश्यक ती मदत करावी. राज्यासाठी पथदर्शी अशा पद्धतीने अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक गावात ही संकल्पना राबवून यशस्वी करावी.
ॲड. ठाकूर म्हणाल्या की, योग्य नियोजन करुन दिशा दिल्यास गावोगावी समृद्धी येईल. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सारखा याचा प्रचार, प्रसार व्हायला हवा. ज्याच्याकडे थोडीतरी शेती आहे अशा व्यक्तीला इतरांकडे शेतमजुरीवर जायची गरज पडता कामा नये अशा पद्धतीने नियोजन करावे. योजनेच्या यशस्वीतेसाठी लोकप्रतिनीधींनी सहभागी व्हावे. त्यामुळे दोन-तीन वर्षात गावे निश्चितच समृद्ध होतील. रोहयोच्या माध्यमातून ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ची अंमलबजावणी करताना कोविड काळात रोजगाराची मोठी संधी आपण उपलब्ध करुन देऊ शकतो.
अमरावती जिल्ह्यात ग्राम समृद्धी योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ बाबतचा आढावा ॲड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला. या ऑनलाईन बैठकीस ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ अंतर्गत समाविष्ट गावांचे लोकप्रतिनिधी, शेतकरी आणि ग्रामस्थही मोठ्या संख्येने सहभागी झाले.
