नमामि गंगे प्रमाणे मुंबईतील नद्यांसाठी योजना करा..
नमामि गंगे प्रमाणे मुंबईतील नद्यांसाठी योजना करा..
नवी दिल्ली, दि. ६ फेब्रुवारी :
मुंबईतील प्रदूषित झालेल्या नद्यांमुळे या नद्यांच्या काठावर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने या नद्यांना पुनरुज्जीवन करण्यासाठी “नमामि गंगे” प्रकल्पाच्या धर्तीवर मुंबईतील नद्यांच्या प्रदूषण नियंत्रण व पुनरुज्जीवनासाठी विशेष निधी व योजना जाहीर करावी, अशी मागणी २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत नियम ३७७ अन्वये मागणी केली आहे. त्यांचा हा प्रस्ताव लोकसभेच्या पटलावर ठेवण्यात आला.
लंडनच्या टेम्स नदीप्रमाणे या नद्यांचे वैज्ञानिक पद्धतीने पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरण करण्यात आले, तर नुकत्याच विकसित झालेल्या ‘कोस्टल रोड’प्रमाणेच मुंबईच्या पर्यटनाला नवी दिशा व नवी उंची मिळेल, असे मत हि त्यांनी या प्रस्तावात नमूद केले आहे.
मुंबई शहरातील मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा या चार प्रमुख नद्या कधीकाळी शहराच्या जीवनरेखा होत्या व नैसर्गिक जलनिचऱ्याचा मुख्य आधार होत्या. मात्र आज अनियंत्रित शहरीकरणामुळे या नद्या केवळ “मोठ्या घातक उघड्या नाल्यां”मध्ये रूपांतरित झाल्या आहेत, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
यामुळे या नद्यांच्या काठावर वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाला असून प्रदूषित पाणी थेट अरबी समुद्रात मिसळत असल्याने समुद्री परिसंस्थेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रदूषणामुळे विद्रूप झालेला वर्सोवा समुद्रकिनारा असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका दरवर्षी या नद्यांच्या स्वच्छतेसाठी व पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्यासाठी सुमारे ४०० ते ६०० कोटी रुपये खर्च करत असली, तरीही पुरेशा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या (एसटीपी) अभावामुळे घाणेरडे पाणी थेट नद्यांमध्ये सोडले जात आहे. म्हणूनच केंद्र सरकारकने “नमामि गंगे” प्रकल्पाच्या धर्तीवर मुंबईतील नद्यांसाठी तातडीने एक ‘विशेष पुनरुज्जीवन पॅकेज’ जाहीर करण्यात यावे. सांडपाणी रोखण्यासाठी आधुनिक व कार्यक्षम एसटीपी प्रकल्पांना गती द्यावी तसेच जलीय जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी इको- रीस्टोरेशनला प्राधान्य देण्यात यावे.
जर लंडनच्या टेम्स नदीप्रमाणे या नद्यांचे वैज्ञानिक पद्धतीने पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरण करण्यात आले, तर नुकत्याच विकसित झालेल्या ‘कोस्टल रोड’प्रमाणेच मुंबईच्या पर्यटनाला नवी दिशा व नवी उंची मिळेल, असे हि खासदार रविंद्र वायकर यांनी प्रस्तावात नमूद केले आहे.
