महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू.
मुंबई, दि. २७ सप्टेंबर :
जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गंगापूर धरण परिसरातील (जि. नाशिक) ‘एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट’ आणि बोट क्लबचे तसेच खारघर (नवी मुंबई) येथील ‘एमटीडीसी रेसीडेन्सी’ या पर्यटक संकुलाचे ई-उद्घाटन करण्यात आले. तसेच राज्यातील पर्यटनस्थळे, तिर्थक्षेत्रे, कृषी पर्यटन, युनेस्को जागतिक वारसास्थळे, राज्यातील विमानतळे, महामार्ग, महत्वाचे हॉटेल्स, रिसॉर्टस्, न्याहरी-निवास, जिल्हा पर्यटन आदींची माहिती देणाऱ्या ‘महाराष्ट्र टुरीजम- समथिंग फॉर एव्हरीवन’ या महाराष्ट्र पर्यटन डेटा बँक पुस्तकाचे यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले की, पुर्वी एरियल फोटोग्राफी करत असताना संपूर्ण महाराष्ट्र फिरलो आहे. राज्याचे सौंदर्य आणि वैभव डोळ्यात मावत नाही. हे वैभव जगापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. राज्यातील फक्त पर्यटनस्थळांचा विकास करुन चालणार नाही. तिथे जायचे कसे, रहायचे कुठे, जवळची रेल्वे स्थानके, विमानतळ, त्या पर्यटनस्थळास भेट देण्याचा योग्य काळ कोणता आदी इत्यंभूत माहिती आणि सोयीसुविधा आपल्याला पर्यटकांसाठी उपलब्ध कराव्या लागतील. आमच्या शासनाने कामकाज सुरु केल्यानंतर लगेच रायगडच्या विकासासाठी ६०० कोटी रुपयांचा निधी दिला. कोकणातील चिपी विमानतळही आता लवकरच सुरु होत आहे. गुंफा, गडकिल्ले, वन्यप्राणी, वाघ, समुद्रकिनारे, जंगले हे राज्याचे वैभव आहे. हे वैभव जगापर्यंत पोहोचवून महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू, असे ते म्हणाले.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, अनेक देशाचे पर्यटन हे मुख्य आर्थिक स्त्रोत आहे. युरोपियन देश, अमेरिका आदी देशांना दरवर्षी सुमारे 8 कोटी पर्यटक भेट देतात. आपल्या राज्यातही पर्यटन क्षेत्रात असाच वाव आहे. मराठवाड्यात कृषी पर्यटन, विदर्भातील जंगल, कोकणातील समुद्र किनारे यांची माहिती पर्यटकांना देता येईल. पर्यटनातून रोजगार निर्मिती बरोबरच राज्याला मोठा महसूलही मिळतो. त्यामुळे राज्याच्या पर्यटन विकासास चालना देण्यात येईल, असे ते म्हणाले.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्याच्या ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी कृषी पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे. कोकणात आता हॉटेल ताज गुंतवणूक करत आहे. येत्या काळात तिथे दोन पंचतारांकित हॉटेल्स तसेच चीपी विमानतळही लवकरच सुरु होईल. राज्यातील समुद्रकिनाऱ्यांच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी बीच शॅक धोरण जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय कॅराव्हॅन टुरिजम आणि साहसी पर्यटनाच्या धोरणावर काम सुरु आहे. वन आणि जलसंपदा विभागाबरोबर समन्वय करुन इको टुरिजम, पक्षी निरीक्षण, ट्रेकींग, सायकलींग आदी उपक्रम सुरु करण्याचा प्रयत्न आहे. वन विभागाच्या गेस्ट हाऊससंदर्भातही चर्चा सुरु आहे. वानखेडे स्टेडीयमची सफर, गेट वे ऑफ इंडियाचा विकास, बीएमसी इमारत पर्यटन आदी उपक्रमही हाती घेण्यात येत आहेत. महाबळेश्वर, माथेरान आदी स्थळांना पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आणत आहोत. पर्यटनामध्ये महाराष्ट्राला पहिल्या क्रमांक आणण्याचे उद्दीष्ट असून त्यासाठी शासनामार्फत सर्व उपाययोजना करण्यात येतील, असे ते
ग्रेप पार्क रिसॉर्ट आणि एमटीडीसी रेसीडेन्सीमध्ये विविध सुविधा.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) नाशिकमधील गंगापूर धरण येथे सुमारे १४.४८ हेक्टर क्षेत्रावर पर्यटन सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. यातील एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्टद्वारे पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या रिसॉर्टमध्ये ४ ट्वीन व्हीला (प्रत्येकी ३ कक्ष), २८ पर्यटक कक्ष, उपहारगृह, जलतरण तलाव, सभागृह, स्वागतकक्ष, प्रतिक्षा कक्ष व इतर मुलभूत सुविधा उपलब्ध आहेत. तसेच याच परिसरात असलेल्या बोट क्लबमधील ११ बोटी प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येत आहेत. या पर्यटन संकुलाचे आज मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते ई-उद्घाटन करण्यात आले. याशिवाय खारघर (नवी मुंबई) येथील सेक्टर १२ मधील सुसज्ज अशा चार मजली ‘एमटीडीसी रेसीडेन्सी’ या पर्यटक संकुलाचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ई-उद्घाटन करण्यात आले. या संकुलात २७ कक्ष, २ लोकनिवास, सोविनियर शॉप, उपहारगृह, व्यायामशाळा, सभागृह, अंतर्गत खेळ, स्वागत कक्ष आदी सुविधा उपलब्ध आहेत. नवी मुंबई परिसरात असलेल्या सिडको, एमआयडीसी आणि खाजगी उद्योगांमुळे विविध कामासाठी येथे येणाऱ्या व्यावसायिक पर्यटकांची संख्या मोठी आहे. तसेच नजिकच्या काळात नवी मुंबई विमानतळ विकसीत होत आहे. याअनुषंगाने एमटीडीसीने हे पर्यटक संकुल विकसीत केले आहे.
