हा तर बॉलिवूडला नख लावण्याचा उद्योग!

0
Bollywood

मुंबई, दि. २५ सप्टेंबर
बॉलिवूड सध्या तुफान चर्चेत आहे, ते नेहमीच असते पण सध्या चर्चेत असण्याचे कारण वेगळे आहे. इथली चमक धमक सर्वांनाच भुरळ पाडते पण याच चमचमत्या दुनियेला ग्रहण लावण्याचे काम सध्या सुरु आहे. अख्ख्या चित्रपटसृष्टीला बदनाम करण्याचा उद्योग सुरु आहे. या मंडळींच्या मागे चौकशा लावून बॉलिवूडवर दबाव आणण्याचा पद्धतशीर कट रचलेला दिसत आहे.मागील दिवसापासून बॉलिवूड व ड्रग कनेक्शनच्या चौकशीसाठी एनसीबी जास्तच सक्रीय झाली आहे. दररोज कोणाला ना कोणाला तर चौकशीसाठी बोलावले जात आहे. पण जे उघडपणे ड्रग घेतो असे सांगत होते. ज्यांचा या ड्रग्जच्या धंद्यात हात आहेत. त्यांना आणि त्यांच्या बॉसला हात लावण्याचे धाडस एनसीबी नावाची मोदी सरकारची यंत्रणा धाडस दाखवत नाही. फक्त या चमकत्या सिताऱ्यांना चौकशीच्या नावाखाली बदनाम केले जात आहे. मुंबईतील ही चमचमती दुनिया मुंबई बाहेर नेण्याचा डाव आखला जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भव्य चित्रपटनगरी उभी करण्याची घोषणा केली हा काय योगायोग नव्हता. याच मुद्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातून आज वस्त्रहरण केले आहे.
सामनामध्ये म्हटले आहे. ‘मुंबईस जी चमक-धमक मिळत असते त्यास ‘मायानगरी’चे अस्तित्व हे कारण आहेच. गेल्या काही महिन्यांपासून या मायानगरीस बदनाम करण्याचे, तिचे खच्चीकरण करण्याचे, त्यात काम करणाऱ्या प्रमुख मंडळींवर दाबदबाव टाकण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. जणू काही सिनेउद्योगाने व त्यात काम करणाऱ्या चमकदार मंडळींनी मुंबई सोडून जावे असे वातावरण निर्माण केले जात आहे. मायानगरीतले कलावंत, दिग्दर्शक, छायाचित्रणकार वगैरे मंडळींनी अभिनय कला सोडली असून ते ‘गर्दुल्ले’ बनले आहेत. त्यांनी आपापल्या घरांच्या गॅलरीत व बाल्कनीत गांजा, अफूची बाग फुलवली आहे, असे चित्र पद्धतशीरपणे निर्माण केले जात आहे,’ असा आरोपही शिवसेनेनं केला आहे.
‘याच चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा वापर पंतप्रधान मोदी व अनेक राज्यांनी आपापल्या राजकीय प्रतिष्ठेसाठी करून घेतलाच आहे. गुजरातमध्ये मोदी व सलमान खान पतंग उडवीत होतेच. अमिताभ बच्चन तर गुजरातचे ब्रॅण्ड ऍम्बेसेडर होते. पंतप्रधान मोदी यांची ‘आंबे’ खाण्याची शास्त्रोक्त पद्धत कोणती याची सखोल माहिती जनसामान्यांना प्राप्त व्हावी म्हणून अक्षय कुमार यांच्यावर खास जबाबदारी होती. मोदी यांच्यावरील चित्रपटात विवेक ऑबेरॉय तर ‘मनमोहन’ सिंग यांच्यावरील चित्रपटात अनुपम खेर यांनी कमाई केलीच आहे. म्हणजे मुंबईच्या चित्रपटसृष्टीतूनच निघालेल्या किरणांनी राज्यकर्त्यांना प्रकाशमान केले आहे. या चित्रपटसृष्टीच्या गळ्यास नख लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, मुंबईच्या चित्रनगरीचे महत्त्व हे कायमच राहील,’ असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *