निलम गोऱ्हेंच्या ‘त्या’ वक्तव्याचे शिंदेंकडून समर्थन.
निलम गोऱ्हेंच्या ‘त्या’ वक्तव्याचे शिंदेंकडून समर्थन.
मुंबई, दि २७ फेब्रुवारी ;
डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिल्लीच्या साहित्य संमेलनातील व्यासपीठावरुन एक वाक्य बोलल्या ते काहीजणांना प्रचंड झोंबले. गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढल्याने त्यांना मिरच्या लागल्या, अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सेनेवर केली.
अंधेरी येथे शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी आयोजित केलेल्या आभार सभेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, डॉ. निलम गोऱ्हे त्यांच्याबाबत आताच बोलल्यात असे नाही, यापूर्वी अनेक लोक बोलले आहेत. राज ठाकरे बोलले त्यांना खोके नाही तर कंटेनर लागतात. नारायण राणे, रामदास कदम, नितेश राणे, निलेश राणे देखील यापूर्वी बोलले आहेत. मात्र लाडकी बहिण डॉ. निलम गोऱ्हे बोलल्या. त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे तुम्हाला शोभत नाही. त्या खरे बोलल्या. आमची देना बँक आहे आणि समोर लेना बँक आहे. निलम गो-हे जे बोलल्या ते कटुसत्य आहे. महिलांवर अत्याचार झाल्यास पहिल्या धावून जाणाऱ्या निलम गो-हे होत्या. शक्ती विधेयकामध्ये त्यांचे योगदान मोठं आहे. जे चांगल काम करतात त्यांना बदनाम कसं करायची ही पोटदुखी आहे. तुम्ही डॉक्टरकडून नाही तर कंपाऊंडरकडून औषध घेत असल्याने पोटदुखी बरी होत नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
कोरोना काळात खिचडी घोटाळा, कोरोना सेंटर घोटाळा, ब़ॉडीबॅग घोटाळा तुम्ही केलात. मुंबईच्या रस्त्यांच्या दुरुस्तीवर पैसे खाल्ले. काहीजणांचा जीव मुंबई महापालिकेत आहे. मुंबई महापालिका ज्यांना सोन्याची अंड देणारी कोंबडी वाटते त्या लोकांना आता आणखी एक धक्का द्यायचा आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला. मिशन मुंबईच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकीत त्यांना घरी बसवायचे आहे.महायुती मजबूत झाली पाहिजे हाच आपला अजेंडा आहे. मुंबई महापालिकेवर भगवा डौलाने फडकवुया हा संकल्प करुया असे ते म्हणाले.
