‘स्वारगेट’ बलात्कार प्रकरणी विभागीय चौकशी.
‘स्वारगेट’ बलात्कार प्रकरणी विभागीय चौकशी.
पुणे, दि. २६ फेब्रुवारी;
स्वारगेट बसस्थानक परिसरात मंगळवारी पहाटे एका महिलेवर अज्ञात व्यक्तीकडून अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बसस्थानकावरील कार्यरत असलेले स्थानकप्रमुख व आगार व्यवस्थापक यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय चौकशी करून दोष आढळल्यास तात्काळ निलंबित करावे. असे निर्देश दिले आहेत.
मंगळवारी पहाटे स्वारगेट बसस्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही एसटी बस मध्ये एका महिलेवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली. यासंदर्भात संबंधित महिलेने स्वारगेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या बसस्थांनकावर कार्यरत असलेले सर्व सुरक्षा रक्षक यांना तात्काळ बदलण्यात यावे, तसेच त्यांच्या ऐवजी दुसऱ्या सुरक्षा रक्षकांना नेमण्याची मागणी संबंधित सुरक्षा मंडळाला करावी असे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल ७ दिवसात सादर करावा अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमानवार यांना दिल्या आहेत.
महिला सन्मान योजने अंतर्गत महिलांना त्यांच्या प्रवास तिकिटामध्ये ५० टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे महिलांची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबरोबरच त्यांची सुरक्षितता हा देखील मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. स्वारगेट बसस्थानक वरील घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांनी महिला प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भात एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलावली आहे. यामध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भात ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे.
