मराठी भाषा संवर्धनाचा वसा सोबत घेऊन परतुया!
मराठी भाषा संवर्धनाचा वसा सोबत घेऊन परतुया!
नवी दिल्ली, दि. २४ फेब्रुवारी :-
मराठी साहित्य सम्मेलन म्हणजे मराठी भाषेचा महाकुंभ असून मराठी भाषेतील सर्व प्रवाहांचा हा संगम आहे. या संगमात तीन दिवस साहित्यस्नान घालून आपण सगळे पवित्र झालो आहोत. त्यामुळे महाकुंभातून परत जाताना जसे आपण गंगेचे पाणी सोबत घेऊन जातो तसे या संमेलनातून परतताना आपण मराठी भाषेचा संवर्धनाचा वसा सोबत घेऊन जाऊया, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळा ते बोलत होते. यावेळी साहित्य संमेलनातील काही साहित्यिकांना तसेच आयोजन समितीतील मान्यवरांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
एकनाथ शिंदे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, अडीच हजार वर्षांचा इतिहास असलेल्या 50 हुन अधिक बोलीभाषांनी समृद्ध असलेल्या आणि ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ अशी वैश्विक भूमिका असलेल्या माय मराठीला मी नमन करतो असे सांगितले. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.. असे आपण कायम म्हणतो मात्र हेच वाक्य दिल्लीत उभे राहून म्हणताना छाती अभिमानाने फुलून येते. याच तालकटोरा स्टेडियमच्या जागेवर 1737 साली मराठ्यांची छावणी पडली होती. महाप्रतापी मराठा सरदारांनी त्यावेळी तलवारीच्या बळावर दिल्लीचे तख्त राखले होते. आज एवढ्या वर्षांनी मराठी साहित्यिकांची छावणी इथेच पडली असून तलवारीने नाही तर सारस्वतांच्या विचारमंचाने लोकांची मने जिंकली आहेत.
अनेक कारणांसाठी हे सम्मेलन स्मरणात राहील, 70 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हे सम्मेलन दिल्ली येथे पार पडत आहे. हे 98 वे साहित्य सम्मेलन असले तरीही अभिजात मराठी भाषेचे ते पहिलेच संमेलन आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद मोदी यांचे मनापासून आभार मानतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण या भाषेचा अडीच हजार वर्षांचा इतिहास दाखवून दिला आणि आता आपल्यावर नवा इतिहास घडवण्याची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले.
माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मी ‘जय जय महाराष्ट्र माझा’.. या गीताला राज्य गीताचा दर्जा दिला. आज सर्व शाळा आणि शासकीय कार्यालयातील प्रत्येक कार्यक्रमात राष्ट्रगीतासोबत हे राज्यगीत अभिमानाने गायले जाते. माझ्याच मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे माझ्यासाठी फार अभिमानास्पद असल्याचे सांगितले. या कार्यात माझाही खारीचा वाटा होता याचाही मला सार्थ अभिमान आहे. यापुढे देखील मराठीच्या विकासासाठी असेच काम करत राहू असा विश्वास यावेळी बोलताना शिंदे यांनी व्यक्त केला.
राजकारण निवडणुकीपूरते असते त्यानंतर संबंध कायम असतात आणि हाच महाराष्ट्र धर्म असल्याचे सांगितले. निवडणूका झाल्यावर राजकारणापलिकडची नाती आम्ही जपत असतो आणि हेच आपल्याला टिकवायचे आहे. ही भाषा माझ्या आईची आहे, ही ज्ञानेश्वर माऊलींची आहे, ही छत्रपती शिवाजी महाराजांचीही आहे, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, बहिणाबाईंच्या ओव्यांची भाषा आहे, ही लोकमान्य टिळकांची भाषा आहे, ही संविधान लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही भाषा आहे. महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे संतांनी येथे भक्ती संप्रदाय निर्माण केला, पराक्रमी वीरांनी शक्तीसंप्रदाय निर्माण केला. मराठी भाषा वात्सल्याची, मायेची भाषा आहे प्रसंग आला तर ती तलवारीची भाषाही बनते. तिच्यात सौंदर्य आहे, संतवाणी आहे, कौतुक करताना ती थकत नाही सेवा करताना अडखळत नाही असे गौरवोद्गार शिंदे यांनी काढले.
