बीडच्या सरपंचाचा निघृण खून करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा.
बीडच्या सरपंचाचा निघृण खून करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा.
लातूर, दि. २४ डिसेंबर ;
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आरोपींना कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन दिले आहे. असे असले तरी या प्रकरणातील आणखी तीन आरोपींना अटक झालेली नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकारवर दबाव आणणार आहोत, असे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सांगितले आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची मराठवाडा तसेच सोलापूरच्या काँग्रेस खासदारांनी सांत्वनपर भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार अमित देशमुख म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सूचनेवरून मराठवाडा व सोलापूर येथील खासदारांसह देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. पीडित देशमुख कुटुंबीय अजूनही दहशतीखाली आहेत त्यामुळे या कुटुंबीयांना ताबडतोब पोलीस संरक्षण देण्यात यावे. देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करेल असेही अमित देशमुख यांनी सांगितले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली असून या प्रकरणी वाल्मिक कराडचे नाव घेतले जात आहे. वाल्मिक कराडला भाजपा युती सरकार मधील मंत्री धनंजय मुंडे यांचे पाठबळ असल्याने या प्रकरणातील मुख्य सुत्रधारावर कारवाई होत नाही अशी चर्चा आहे. या प्रकरणाने हिवाळी अधिवेशनातही जोरदार खडाजंगी झाली. वाल्मिक कराडला अटक करावी व धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी जोर धरत आहे.
