महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे का?
महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे का?
नवी दिल्ली दि. २० डिसेंबर ;
संसदेचे कामकाज सुरळीत चालवण्याची जबाबदारी ही सत्ताधारी पक्षाची असते. त्यांनी पुढाकार घेऊन चर्चा केली पाहिजे पण दुर्दैवाने देशातील मायबाप जनतेला मला हे सांगावं लागेल की, यावेळी संसदेचं कामकाज सुरळीत चालवण्याची जबाबदारी ही सुरळीत चालू ठेवण्यात सरकार अपयशी ठरलेलं आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अधिवेशनात राज्य, देश आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्याशी संबंधित विषयांवर चर्चा करावी यासाठी आम्ही संसदेत जातो. पण जेव्हा गदारोळ होतो आणि चर्चाच होत नाही, त्यावेळी खूप अस्वस्थ वाटतं. एका सशक्त लोकशाहीमध्ये विरोधक आंदोलन करत असतात, जो त्यांचा अधिकारही आहे पण यंदाच्या अधिवेशनात सत्ताधारीही आंदोलन करताना दिसले. मतं वेगळी असू शकतात, त्यात काही गैर नाही पण एका सशक्त लोकशाहीत संसदेमध्ये चर्चा व्हायलाच हवी..
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याची दृश्य अतिशय अस्वस्थ करणारी होती. महाराष्ट्रात अशी गुंडागर्दी आम्ही कधीही पाहिली नाही. आम्ही अशी गुंडागर्दी खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही, अशी परिस्थिती आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या घटनांमुळे राज्यात सध्या अस्थितरता दिसते. रोज कुठेना कुठेतरी मारामाऱ्या, खून, दहशत माजवणे, असे प्रकार होत आहेत. मुंबईच्या कल्याणमधील घटनेने पुन्हा एकदा मराठी-परप्रांतीय वाद उफळला आहे. राज्यात महायुतीला जनतेने मोठा बहुमत दिले आहे मात्र तरी देखील अद्यापही राज्याला गृहमंत्री नाही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तातडीने ॲक्शन घेऊन हे थांबवला पाहिजेत अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
राज्यात सध्या बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्येचे प्रकरण गाजत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांची बदली करून काही होणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून तसेच पोलीस अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव होता का? हे तपासून कठोर कारवाई करण्यात यावी दरवेळी वर्दी घालणाऱ्यांवर कारवाई करायची आणि षडयंत्र रचणारा घटनेमागील खरा सूत्रधार मात्र मोकळा, असं नाही चालणार.असेही सुप्रिया सुळे यांनी बोलताना सांगितले आहे.
महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही, अशी परिस्थिती आहे. खून, मारामारी, दहशत माजविण्याचे प्रकार ही नित्याचीच बाब झाली आहे. बारामतीत खून झाल्याची घटना घडली. ही गेल्या काही दिवसांतील तिसरी घटना आहे. तर तिकडे कल्याणमध्ये तुम्ही मराठी माणसं घाण आहात असा आरडाओरडा करीत एका मराठी माणसाला त्याच्या राहत्या सोसायटीत गुंडांकरवी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आले आहे. ही अतिशय गंभीर परिस्थिती असून सर्वसामान्य माणूस भीतीच्या छायेखाली वावरत आहे. राज्य सरकारने या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन राज्यात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी काम करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.
