अडीच वर्षासाठी मंत्री पदाची संधी !
अडीच वर्षासाठी मंत्री पदाची संधी !
नागपूर दि. १६ डिसेंबर –
अपयशाने खचून जायचे नाही आणि विजयाने हुरळून जायचे नसतं…जबाबदारी ज्यावेळी येते त्यावेळी जबाबदारीचे भान ठेवायचे असते ही शिकवण घेऊन आम्ही काम केले. शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांची विचारधारा एकसंघ ठेवणारी आहे. तीच विचारधारा घेऊन आपण काम करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस याच विचारधारेवर काम करत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची भूमिका नागपूर येथील मेळाव्यात व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भातील पदाधिकारी व कार्यकर्तांचा भव्य मेळावा देशपांडे सभागृहात पार पडला. महाराष्ट्राला पुढे न्यायचे आहे हे एकच ध्येय महायुतीचे आहे. तीन वर्षे निवडणूकांपासून वंचित राहिलो आहोत. सहकार क्षेत्रातील निवडणूकाही व्हायच्या आहेत. मंत्रीमंडळ अस्तित्वात आल्यावर तिन्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चर्चा करुन महामंडळाची पदे तात्काळ भरली जाणार आहेत असेही अजित पवार यांनी सांगितले.
पक्षातील आमदारांना अडीच वर्षासाठी मंत्री पदाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे इतर आमदारांना संधी मिळेल असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
जानेवारी महिन्यात दोन दिवसाचे शिबीर घेण्याचे जाहीर करतानाच याच शिबिरातून चांगला कार्यकर्ता आणि खर्डा वक्ता तयार होतो म्हणून अशी कार्यकर्त्यांसाठी शिबीर घ्यायची असतात असेही अजित पवार म्हणाले.
विदर्भावर कुठेही अन्याय होणार नाही असा शब्द देतानाच संघटना मजबूत करायची आहे. पक्षाची राष्ट्रीय पक्षाची मान्यता गेली आहे ती मिळवण्यासाठी इतर राज्यात आपण निवडणूका लढवत आहोत हेही आवर्जून अजित पवार यांनी सांगितले.
आपल्या पक्षाचा यावेळी विदर्भात शंभर टक्के स्ट्राईक रेट राहिला असता परंतु थोड्या फरकाने मोर्शीची जागा गेली नसती तर आपल्याला हे उद्दिष्ट गाठता आले असते अशी खंतही अजित पवार यांनी व्यक्त केली.
