सरकारच्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार.
सरकारच्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार.
नागपूर, दि. १५ डिसेंबर ;
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे अंबादास दानवे, सुनिल प्रभू, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. या बैठकीत सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्य़ाचा निर्णय घेण्यात आला.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, या अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न नाहीत, प्रश्नोतरे नाहीत. केवळ ५ दिवसांचे अधिवेशन घेतले जात आहे. अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरी जनतेच्या प्रश्नावर सरकार जाब विचारु. शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, नोकरभरती, बीड जिल्ह्यातील सरपंचाची हत्या, परभणीतील पोलीस अत्याचार या प्रश्नी सरकारला प्रश्न विचारू असेही दानवे म्हणाले.
विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, विदर्भाच्या भूमित अधिवेशन होत असून एवढ्या अल्पकालावधीचे अधिवेशन पहिल्यांदाच होत आहे. अधिवेशन किमान तीन आठवड्यांचे असायला हवे होते. विदर्भातील अनेक प्रश्न आहेत त्यावर अधिवेशनात चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. भाजपा युती सरकारच्या काळात महाराष्ट्र अधोगतीला गेला आहे, राज्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवला आहे. शेतकरी आत्महत्या होत आहेत. भाजपा युतीने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी असेही वडेट्टीवार म्हणाले.
