मंदिरांचे रक्षण करणे हे आमचे परमकर्तव्य.

0
images (16)

मंदिरांचे रक्षण करणे हे आमचे परमकर्तव्य.

मुंबई, दि. १४ डिसेंबर :

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दादर येथील हनुमान मंदिराच्या नोटीसीवरुन भाजपाविरोधात विधान केले होते. त्यांच्या या विधानाला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मंदिरांचे रक्षण करणे हे आमचे परमकर्तव्य आहे. त्या भावनेतूनच आमचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असेल. राजकारण करणाऱ्यांनी राजकारण करावे, असे सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर दरेकर म्हणाले की, सत्तेच्या माध्यमातून मलई संजय राऊत यांना समजून आलेली आहे. आम्ही राज्यातील जनतेच्या हितासाठी आहोत. मलई खाण्यासाठी हे सरकार आलेलं नाही. संजय राऊत हे विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेतून बोलत राहतात, त्यांच्या बोलण्याला कुणीही गांभीर्याने घेत नाही. हे सरकार जनतेच्या हितासाठी काम करतेय. एवढ्या मोठ्या राज्याचे मंत्रिमंडळ आहे, तीन पक्षाचे सरकार आहे. थोडा विलंब जरूर होतोय परंतु जे होईल ते शाश्वत होईल. संजय राऊत यांनी चिंता करण्याचे कारण नाही, फक्त सकाळची बडबड सुरू ठेवावी.

संजय राऊत यांनी अधिवेशनात एखादा स्फोट होऊ शकतो, असे विधान केले होते त्यावर दरेकर म्हणाले की, निराधार बोलण्याचे संजय राऊत यांचे रोजचे काम आहे. ते रोज बडबडताना दिसताहेत. कुठल्या फाईल आहेत, त्यांचे आमदार आहेत त्यांची विरोधी पक्षातील लोकं आहेत. उद्धव ठाकरे स्वतः येणार आहेत. त्यांना विधिमंडळात बोलायला सांगा. विधिमंडळ आपल्यासाठी आहे. लोकशाहीत कुठलीही भुमिका मांडण्याचा अधिकार आहे. बडबड करण्यापेक्षा कृती करावी, अशी विनंती आहे.

दादर हनुमान मंदिरावरून संजय राऊत यांनी केलेल्या टिकेवर प्रत्युत्तर देत दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांनी घंटाच हलवीत बसावे. वाह्यात बोलण्याशिवाय त्यांना रचनात्मक बोलणे माहीतच नाही. केंद्रात एनडीएचे सरकार आहे, रेल्वे मंत्रीही आमचे आहेत. ज्यावेळी आम्ही हिंदुत्वाची भुमिका घेतो, आमच्या देवदैवतांच्या सन्मानाची भुमिका घेतो त्यावेळी या गोष्टीकडे आमचे दुर्लक्ष होऊ शकत नाही. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः याप्रकरणात लक्ष घालून आहेत. आमच्या हिंदूंना, हिंदुत्वाला न्याय दिल्याशिवाय राहत नाही.

 

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *