मविआचे आमदार खासदार भाजपाच्या संपर्कात.
मविआचे आमदार खासदार भाजपाच्या संपर्कात.
मुंबई, ता. १२ डिसेंबर –
महाविकास आघाडीतील काही आमदार-खासदार अस्वस्थ असून ते आपली अस्वस्थता आमच्याकडे व्यक्त करीत आहेत. मविआचे अनेकजण भाजपाच्या संपर्कात आहेत असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले, की आमच्या पक्षांचे आमच्याकडे दुर्लक्ष होत असून पक्षांकडून पाठबळ मिळत नाही. मतदारसंघांतल्या परिस्थिती विषयी बैठकांचे आयोजन केले जात नाही, अशीही संपर्कात असलेल्यांच्या तक्रारी आहेत.
ऑपरेशन लोटससंदर्भात बावनकुळे म्हणाले, की तपास यंत्रणा त्यांचे काम करत असतात. आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही. ईडी, सीबीआयचा वापर केला जातो हे महाविकास आघाडीच्या लोकांचे नेहमीचे रडगाणे आहे. मात्र, मोदींनी केलेल्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आमच्या पक्षात कोणी आले तर त्यांचे स्वागत आहे.
मारकडवाडी येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत त्यांनी अशी टीका अयोग्य आहे. त्यांना पार्टीकडून समज देण्यात येईल, असे सांगितले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते आणि आमचे केंद्रीय नेतृत्व चर्चा करून समन्वयाने योग्य निर्णय घेईल. आम्ही जनतेला जाहीरनाम्यातून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याला आमचे सध्या प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
