अयोध्या कोणाच्या बापाच्या मालकीची नाही!
मुंबई, दि.12 सप्टेंबर:
अभिनेत्री कंगना राणावत प्रकरणात विश्व हिंदु परिषदेने उडी घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येत येऊ नका असे म्हटले आहे. यावर काँग्रेसचे नेते तथा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विश्व हिंदु परिषदेचा खरपूस समाचार घेतला आहे. विश्व हिंदू परिषद धर्माचे मालक नाहीत, त्यांनी जास्त वळवळ करु नये, विश्व हिंदू परिषदेत केवळ हिंदू नाव आल्याने धर्म त्यांचा झाला का? आम्ही हिंदू नाही का? यांचे बापाचे आम्ही बांधील नाही. विश्व हिंदू परिषदेने या भानगडीत पडू नये असे त्यांनी सुनावले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ज्या दिवशी अयोध्येला जाऊ वाटेल त्यावेळी ते जातील. अयोध्या कोणाच्या बापाच्या मालकीची नाही, कोणी कोणाला रोखू शकत नाही, हिंमत असेल तर रोखून दाखवा असा दम विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
कंगना व शिवसेना यांच्यातील वादात संतांनी कंगनाला पाठिंबा देत उद्धव ठाकरेंना विरोध केला आहे. उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत येऊ नये व ते आले तर त्यांचे स्वागत तर होणार नाहीच पण त्यांना विरोध केला जाईल असे विहिंप व संतांनी म्हटले होते.
