साऊथ में साफ, नॉर्थ में हाफ, कहाँ से आयेगा ४०० पार?

0
mumbai c11

मुंबई, दि. १८ एप्रिल:

लोकसभेची ही लढाई देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे, लोकशाही व देशाचे संविधान वाचवण्याची ही लढाई आहे. भारतीय जनता पक्ष महत्वाच्या प्रश्नांना बगल देऊन वेगळा अजेंडा जनते समोर मांडत आहे परंतु त्यांच्या अजेंड्याला बळी पडू नका. खोटं बोल पण रेटून बोल, ही भाजपाची निती आहे आपण मात्र सत्य मांडू व भाजपाला जाब विचारु. लोकसभा निवडणुकीची ही लढाई हिटलशाही, दहशतशाही व मनुवादाविरोधातील लढाई असून एक होऊन त्याविरोधात लढण्याची गरज असल्याचे आवाहन मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे.

दक्षिण मध्य मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत वर्षाताई गायकवाड बोलत होत्या, त्या पुढे म्हणाल्या की, भाजपाने १० वर्षात सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स विभागाच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला, या कारवाईला घाबरून काहीजण भाजपात गेले. कालपर्यंत या सरकारी यंत्रणा ज्यांना नोटीस पाठवायच्या ते भाजपात गेले की वॉशिंग मशीन मधून स्वच्छ झाले, याशिवाय काही लोकांचे क्लोजर रिपोर्टही येत आहेत. भाजपा सरकारच्या हुकूमशाहीला आता घरी बसवण्याची वेळ आली आहे. १० वर्षात भाजपा सरकारने काय केले? भाजपाच्या नेत्यांना व उमेदवारांना जाब विचारला पाहिजे. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे काय झाले? प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख जमा करण्याचे काय झाले? महागाई कमी का केली नाही? महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर का बोलत नाही? असे प्रश्न विचारले पाहिजेत. भाजपाच्या उमेदवारांना काही भागात जनता प्रवेश देत नाही. लोक भाजपाच्या खोटेपणाला कंटाळले आहेत.‘अब की बार ४०० पार’ हा भाजपाचा प्रपोगंडा आहे,‘साऊथ में साफ, नॉर्थ में हाफ कहाँ से आयेगा ४०० पार? असे म्हणत भारतीय जनता पक्ष १८० जागांच्या वर जाऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

दक्षिण मध्य मतदारसंघातील खासदराने लोकसभेत स्थानिक प्रश्न मांडले नाहीत. रेल्वेचे प्रश्न मांडले नाहीत, धारावीतील ७ लाख लोकांना बेघर केले जात आहे पण त्यावर खासदार संसदेत बोलले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी ज्यांना मुंबई महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष केले, दोनदा खासदार केले ते उद्धव ठाकरेंचे झाले नाहीत तर जनतेचे काय होणार असा सवाल करत, ५० खोके आणि अदानीचे डोके, असा टोला लगावला आणि दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातील उमेदवार अनिल देसाई यांना धारावीतून सर्वात जास्त मताधिक्य देऊ, इतर जिल्ह्यातूनही बहुमत देऊन विजयी करू, असा विश्वास वर्षाताई गायकवाड यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *