आपला लढा मविआ आणि उद्धव ठाकरेंबरोबर..
मुंबई, दि. ८ एप्रिल;
उद्धव ठाकरे अब की बार भाजपा तडीपार अशी फुसकी जिकडे जातील तिकडे सोडताहेत. पण रविंद्र वायकर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेले, प्रविण मर्गज आमच्याकडे आले. म्हणजे जोगेश्वरीतून अब की बार उबाठा सेना तडीपार असे म्हणावे लागेल. भाजपा हा खऱ्या लोकशाही मूल्यांवर चालणारा सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे. हा कुणाचा पारिवारिक पक्ष नाही. या पक्षाचा मालक कार्यकर्ता आहे. कालपासून तुम्ही खासगी पक्षात होता आजपासून तुम्ही सार्वजनिक पक्षात आला आहात, असा टोलाही भाजपा मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी लगावला.
भाजपा हा एकमेव राष्ट्रीय पक्ष असा आहे ज्याचा जन्म मुंबईत झाला. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा पक्ष आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने गळे काढायचे, घोषणा द्यायच्या, मतं मागायची याशिवाय उबाठा सेनेने काहीच केले नाही. आमच्या शिवरायांच्या आरामाराचे सैन्य व त्यांच्या पराक्रमाची अष्टमुद्रा ही भारतीय संरक्षण दलाच्या झेंड्यावर कुणी आणली असेल तर ती पंतप्रधान मोदींनी. आग्रा येथे शिवरायांचे राष्ट्रीय संग्रहालय हे तेथील भाजपाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बगलबच्यानी २५ वर्ष मुंबईवर राज्य केले. त्यावेळी मुंबईला बॉंबे म्हटले जायचे. संसदेत बॉंबेचे मुंबई तत्कालीन भाजपा खासदार राम नाईक यांनी केल्याची आठवणही शेलार यांनी करून दिली.
आपला लढा महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंबरोबरच आहे. ही अभद्र युती महाविकास आघाडी आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मराठी माणसाच्या छातीवर काँग्रेसच्या मुरारजी देसाई, स. का. पाटील यांच्या सरकारने गोळ्या घातल्या. त्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरेंच्या पक्षाने हातमिळवणी केली. मराठी माणसाच्या खुणाच्या रक्ताने रंगलेला काँग्रेसचा हात उद्धव ठाकरेंनी हातात मिळवला आहे याचा अर्थ संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील मराठी माणसाच्या रक्ताचे ठसे उद्धव ठाकरेंच्या हातालाही लागले असल्याचा घणाघात शेलार यांनी केला. पंतप्रधान मोदींचे स्वप्न भारताला विकसित करण्याचे आहे. तुमच्या सर्वांना उचित न्याय, सन्मान देणे ही माझी जबाबदारी आहे, असा विश्वासही शेलार यांनी दिला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर, उपजिल्हा अध्यक्ष दीपक खानविलकर, जोगेश्वरी-पूर्व विधानसभा निवडणूक प्रमुख उज्वला मोडक, मंडळ अध्यक्ष आनंद परब, माजी नगरसेवक मुरजी पटेल, सुभाष दरेकर आदी उपस्थित होते.
