ब्रिटीश करू शकले नाहीत ते मोदी काय करणार?
ब्रिटीश करू शकले नाहीत ते मोदी काय करणार?
मुंबई, दि. १ सप्टेंबर :
अदानीच्या पैशाने काँग्रेसला हरवण्याचे स्वप्न नरेंद्र मोदी पहात आहेत. काँग्रेसमुक्त भारत करण्याचे स्वप्न ते पहात आहेत पण जगात एकवेळ सर्वात शक्तीशाली ब्रिटीश सत्ता होती, ती ब्रिटिश सत्ता काँग्रेसला संपवू शकली नाही, काँग्रेस पक्षानेच सर्वशक्तीमान ब्रिटीशांना देशातून पळवून लावले तिथे नरेंद्र मोदी काय काँग्रेसमुक्त भारत करणार? असा हल्लाबोल काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी भाजपावर केला.
काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राहुलजी गांधी यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राहुलजी गांधी यांनी भाजपच्या विद्वेषी राजकारणाचा खरपूस समाचार घेतला. राहुलजी गांधी पुढे म्हणाले की, जगातील दोन मोठ्या वर्तमानपत्रांनी अदानीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे. भारतातून १ बिलीयन डॉलर परदेशात गेले व तो पैसा पुन्हा भारतात गुंतवून अदानीने भरपूर संपत्ती कमावली. या संपत्तीतूनच अदानीने देशातील विमानतळ, रेल्वे, खाणी, वीज, बँका विमा कंपन्या विकत घेतल्या. आता अदानी धारावीला संपवण्याचे काम करत आहेत पण त्यांना धारावी समजलेली नाही. काँग्रेस पक्ष धारावी संपवू देणार नाही. गरिबांचा हिंदुस्थान संपवण्याचे मोदींचे स्वप्न काँग्रेस पूर्ण होऊ देणार नाही.
काँग्रेस पक्षात दम नाही असे म्हणतात मग कर्नाटकात भाजपाचा सफाया कोणी केला? महाराष्ट्रातही भाजपाचा पराभव होणार आहे, तेलंगणा, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशमधूनही भाजपा पराभव होणार असून त्यानंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षच भाजपला पराभूत करून विजयी होणार आहे. मोदी सरकारने कितीही यंत्रणा कामाला लावू दे, काहीही करु देत काँग्रेस पक्षाला कोणीही रोखू शकत नाही. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष मजबूत आहे कारण काँग्रेस पक्ष विचारधारेचा पक्ष आहे, काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कोणालाही घाबरत नाही.
