शासन पालिकांच्या पाठीशी, पण हलगर्जी नको!
मुंबई, दि 24 ऑगस्ट :
शासन पालिकांच्या पाठीशी पण कोरोना रोखण्यात हलगर्जी नको. नागरिकांनी देखील आरोग्याचे सर्व नियम काटेकोरपणे पालन तितकेच गरजेचे आहे असे स्पष्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील पालिकांनी कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून हा लढा अधिक तीव्र करावा असे सांगितले. तसेच पावसाळीआजार, खड्डे, रस्ते कचरा या इतर बाबींवरही लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली त्यात ते बोलत होते.
कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते, हा जगभरातील अनुभव आहे. त्यावरून ठाणेकरांनी गाफील राहून चालणार नाही, त्यासाठीच प्रशासनामार्फत मोठ्या प्रमाणावर सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. लॉकडाऊन नंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली आहे. दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु हे करत असतांना आपल्याला कायम सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर नियमांचे नागरिकांनी पालन करावे. कायम सतर्क राहावे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी.
आपल्या सर्वांना मास्कचा नियमित वापर करावाच लागणार आहे. वारंवार हात धुणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे आहे.
पावसाळी आजारांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. ठाणे मुंबईला लागून आहे. गेले काही महिने सातत्याने कोरोनावर लक्ष दिले गेले परंतू आता आपल्याला इतर बाबींवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे असेही त्यांनी सांगितले. याशिवाय आगामी काळात विविध धर्मिय सण असल्याने पुढचा टप्पा महत्त्वाचा आहे.सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असेही त्यांनी सागितले.
कोरोना बरा झाल्यानंतर रुग्णांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर असतो हे लक्षात ठेवुन रुग्णांवर उपचार करावे. तसेच कोराना रुग्णावर उपचार करतांना काळजी घेण्याची गरज आहे. अनावश्यक औषधोपचार टाळण्यावर भर देण्यात यावा. कोरोना बरा झालेल्या रुणांशी यंत्रणांनी एक महिना संपर्क साधावाअसेही त्यांनी सांगितले.
दिवसेंदिवस कोरोनाची लक्षणे बदलत आहेत. लक्षणे विरहीत रुग्णांवर बारकाईने लक्ष द्यावे असेही त्यांनी सांगितले.
यंत्रणेचे तीन भागात विभाजन आहे. लोकप्रतिनिधींनी जनजागृती करण्यावर भर द्यावा. पोलिस व महानगर पालिकांनी ट्रॅकिंग व ट्रेसिंगवर भर द्यावा. चेस द व्हायरस मोहिम प्रभावीपणे राबवावी.रुग्णाला व्हेंटीलेटरपेक्षा ऑक्सीजनची आवश्यकता आहे. रुग्ण बरा होईपर्यंत ऑक्सीजनची व्यवस्था करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कोरोना उपचाराबाबत शंका असल्यास टास्क फोर्सला शंका विचारावी असेही त्यांनी सांगितले. सर्व मनपांच्या मागे शासन ठाम व खंबीरपणे उभे आहे. मात्र प्रयत्नांमध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही हे स्पष्ट करुन प्रत्येक मनपाने कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातुन प्रभावीपणे काम करावे असे त्यांनी सांगितले.
कोरोना रुग्णांना मानसिक आधार देण्याची आवश्यकता आहे. कोरोनावर औषध नाही म्हणून लोक घाबरत आहेत. डॉक्टर-रुग्ण-औषधे यांची गाठ वेळेत होणे आवश्यक आहे. ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि योग्य उपचार यांचा वापर करावा. जनतेमध्ये कोरोना विषयी आजही गैरसमज आहेत. त्यामुळे उपलब्ध साधनसामग्रीचा सुयोग्य वापर करुन हे संक्रमाण नियंत्रणात ठेवायचे आहे. प्रयत्न करताना स्वत:ची व कुटुंबाचीही काळजी घ्या असे शेवटी मुख्यमंत्री यांनी आवाहन केले.
