मेळाव्यांमधून 5 लाख रोजगार उपलब्ध करून देणार…
मेळाव्यांमधून 5 लाख रोजगार उपलब्ध करून देणार…
मुंबई, दि. 3 डिसेंबर :
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यास विद्यार्थी आणि नोकरीइच्छूक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट यांनी सहभाग घेऊन 8 हजार 448 रिक्त जागांसाठी विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेतल्या.
राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते सकाळी मेळाव्याचे उद्घाटन झाले. राज्य शासनाने 75 हजार सरकारी नोकरी देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात ५ लाख रोजगार देण्यात येतील, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.
याप्रसंगी कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन., औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी, कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, विभागाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. प्रमोद शिंदे, कौशल्य विकास उपायुक्त डी. डी. पवार, उपायुक्त शालिक पवार, माजी नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांच्यासह विविध कंपन्या, आर्थिक विकास महामंडळे यांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
लोढा म्हणाले की, युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम राबवीत आहे. नुकतेच १ लाख २५ हजार रोजगार देण्यासाठी विविध कंपन्यांबरोबर विभागाने सामंजस्य करार केले आहेत. रोजगार मेळावा उपक्रमालाही चालना देण्यात येत असून येत्या काळात राज्यभरात असे ३०० रोजगार मेळावे घेण्याचे नियोजित आहे. उद्योग आणि बेरोजगार उमेदवारांमध्ये समन्वय साधण्यासाठी येत्या दोन महिन्यात मोबाईलवर महास्वयम ॲप उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी घोषित केले.
कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. म्हणाले की, रोजगार मेळाव्यांसाठी आतापर्यंत 60 हजार रुपयांची खर्च मर्यादा होती, ती आता शासनाने ५ लाख रुपयांपर्यंत वाढविली आहे. यामुळे रोजगार मेळावे प्रभावी पद्धतीने आयोजित करणे शक्य होत आहे. रोजगार मेळाव्यांमध्ये नोकऱ्यांबरोबरच स्वयंरोजगारासाठी शासनाच्या विविध आर्थिक विकास महामंडळाकडून राबविल्या जाणाऱ्या कर्ज योजनांची माहिती, उमेदवारांचे कौन्सिलिंग असे उपक्रमही राबविण्यात येत आहेत.
टीएनएस एंटरप्राइजेस, फास्टट्रॅक मॅनेजमेंट सर्विसेस, बझवर्क्स बिजनेस सर्विसेस, इम्पेरेटिव्ह बिझनेस, युवाशक्ती स्किल इंडिया, स्मार्टस्टार्ट जॉब सोल्युशन्स, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, स्पॉटलाईट, इनोवेशन कम्स जॉईन्टली, बीव्हीजी इंडिया लिमिटेड, शार्प एचआरडी सर्विस, मॅट्रिक्स कॅड अकॅडमी, युनिकॉर्न इन्फोटेक, स्टेलर सिक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्विसेस, करिअर एन्ट्री, टीम हायर, क्रिस्टल सोल्युशन्स लिमिटेड, पियानो प्रेसिडेल या कंपन्यांनी त्यांच्याकडील विविध रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
