नगराध्यक्ष व सरपंचाची निवड पुन्हा थेट जनतेमधून

0
cm 9

नगराध्यक्ष व सरपंचाची निवड पुन्हा थेट जनतेमधून..

मुंबई, दि. १४ जुलै;

राज्यातील नगरपालिकांचे नगराध्यक्ष व सरपंचाची निवड थेट जनतेमधून करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सध्या ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचाची निवड करण्याची पद्धत आहे. मात्र लोकांमधून सरपंच निवडल्यास ग्रामपंचायतींचे काम अधिक परिणामकारक होईल, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

विशेष ग्रामसभेसमोर शिरगणतीद्वारे साध्या बहुमताने सरपंचावरील अविश्वास प्रस्ताव घेता येईल. मात्र सरपंच किंवा उपसरपंचांच्या निवडणुकीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या कालावधीत आणि पंचायतीची मुदत समाप्त होण्याच्या सहा महिन्यांच्या आत असा कोणताही अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही.

नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष हे थेट जनतेमधून निवडणे, अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कालावधी 5 वर्ष करणे तसेच थेट निवडून आलेल्या अध्यक्षांविरुध्द  पहिल्या अडीच वर्षात अविश्वास ठराव आणता येणार नाही असा निर्णयही घेण्यात आला आहे.

नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये अध्यक्ष नगर सेवकांमधून निवडून देण्यात येत होते तसेच अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कालावधी हा अडीच वर्षांचा होता व अध्यक्षांविरुध्द पहिल्या एक वर्षात अविश्वास ठराव आणता येणार नाही अशी तरतूद होती. नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात नगरपरिषदा व नगर पंचायतींच्या निवडणूका प्रस्तावित असून नगरपरिषदा व नगरपंचायतींचे कामकाज सुरळीतपणे सुरू राहण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *