… तर सर्व मालमत्ता भाजपाला दान करेन
… तर सर्व मालमत्ता भाजपाला दान करेन.
नवी दिल्ली, दि. ५ एप्रिल:
कष्टाच्या पैशाने घेतली जमीन व जागा घेतलेली आहे, कसलीही नोटीस न देता जप्तीची कारवाई केली आहे. कोणत्याही गैरव्यवहाराचा एक रुपया जरी खात्यात आला असेल आणि त्यातून मालमत्ता केली असेल तर सर्व मालमत्ता भाजपाला दान करायला तयार आहे अशी प्रतिक्रीया संजय राऊत यांनी दिली आहे.
ईडीच्या कारवाईवर बोलताना संजय राऊत म्हणाले,२००९ ची मालमत्ता आहे. एक एकरही पूर्ण जागा नाही. पत्नीच्या किंवा आमच्या नात्यातल्या लोकांच्या अधिकृत पैशातून घेतलेल्या त्या जागा आहेत. ईडीला आता त्याच्यात आर्थिक गैरव्यवहार दिसायला लागला. राजकीय सूड कोणत्या थराला जाऊन पोहोचला आहे ते तुम्ही पाहिले असेल. अशा कारवायांमधून अजून प्रेरणा मिळते. आमचं राहतं घर जप्त केलंय. त्यावर भाजपाचे लोक उड्या मारत आहेत, फटाके वाजवत आहेत. मराठी माणसाचे हक्काचे राहते घर जप्त केल्याबद्दल त्यांना आनंद होत आहे, असेच करत राहिले पाहिजे. यातून लढण्याची अजून प्रेरणा मिळते.
अशा कारवायांनी संजय राऊत किंवा शिवसेना झुकणार नाही, वाकणार नाही. याच घरात येऊन काही महिन्यांपूर्वी भाजपाच्या लोकांनी महाराष्ट्रातले सरकार पाडण्यासाठी मदत करा, अशा धमक्या दिल्या होत्या. नाहीतर तुम्हाला खूप संकटांना सामोरे जावे लागेल, असे म्हटले होते, असेही राऊत म्हणाले.
