आपल्या रामाचा वनवास अखेर संपला!
मुंबई, दि.4 ऑगस्ट
अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर साकारले जावे यासाठी 500 वर्षांपासून लढा सुरू होता या लढ्याला यश आले असून हे स्वप्न आता सत्यात उतरत आहे. अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले जात असून बुधवारी 5 ऑगस्टला या मंदिराचे भूमिपूजन होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अखेर आपल्या रामाचा वनवास संपला, असे म्हटले आहे.
राज ठाकरे पुढे असे म्हणतात की, जवळपास ३ दशकांचा संघर्ष, शेकडो करसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांचा त्याग ज्या एका मूर्त स्वप्नासाठी होता, त्या स्वप्नपूर्तीचा क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आपल्या रामाचा वनवास संपला. बुधवारी राममंदिराचं अयोध्येत भूमिपूजन होणार, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे.
अयोध्येत उभं राहणारं राममंदिर हे नेहमीचं मंदिर नाही, ते प्रतीक आहे शतकानुशतकं हिंदू बांधवांच्या मनात सुरु असलेल्या त्राग्याचं, अगतिकतेचं, ते प्रतीक आहे कोट्यावधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं, सहनशीलतेचं आणि म्हणूनच ह्या क्षणाचं महत्व वेगळं आहे.
तीन दशकांचा संघर्ष साधा नव्हता, त्यात अनेक करसेवकांना आणि जनसामान्यांना जीव गमवावा लागला, आज त्या करसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गगती मिळेल. ह्यासाठी नेटाने न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या सरकारने जे प्रयत्न केले ते निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन.
अर्थात ह्या क्षणी स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आज ह्या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते, त्यांना मनापासून आनंद झाला असता.
सध्या कोरोनाचं संकट आहे पण ज्या इच्छाशक्तीने कोट्यवधी भारतीयांनी राममंदिराचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं त्याच इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाच्या संकटावर मात करून भारत बलशाली होईल ह्याची मला खात्री आहे.
तमाम हिंदू बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन.
