कोकणात जाणा-या चाकरमान्यांचा जाच थांबवा!

0
IMG-20200730-WA0024

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय थांबवा.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे राज्यपालांना साकडे.
कोकणच्या आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट.
मुंबई, दि.३ ऑगस्ट :

गणेशोत्सवासाठी मुंबई ठाण्यातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आपल्या गावी जात आहे. परंतु सध्या त्यांची गैरसोय होत आहे. रायगडमधील खारपाडा, रत्नागिरीतील कशेडी आणि सिंधुदुर्गातील खारेपाटण येथील तपासणी नाक्यांवर पासेसमुळे किंवा प्रशासकीय यंत्रणेत समन्वय नसल्यामुळे चाकरमान्यांना आठ-आठ, दहा-दहा तास ताटकळत राहावे लागत आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. याप्रकरणी राज्यपाल कोश्यारी यांनी तात्काळ मुख्य सचिवांशी संर्पक साधून कोकणात गणेशात्सवात जाणा-या चाकरमान्यांना त्रास होता कामा नये याची योग्य काळजी घ्या असे आदेश दिले आहेत.
विरोधी पक्षनेते दरेकर गेले दोन दिवस कोकण दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी खारपाडा, कशेडी, खारेपाटण येथील तपासणी नाक्यांवर भेट देऊन गणेशात्वासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांच्या व्यवस्थेची पाहणी केली व माहिती घेतली. चाकरमान्यांना होणा-या त्रासाबद्दलची माहिती आज त्यांनी राज्यपालांना भेटून दिली व सर्व परिस्थितीची कल्पना दिली. आणि चाकरमान्यांची गैरसोय थांबवावी यासाठी निवेदन दिले. याप्रसंगी आमदार भाई गिरकर, आमदार योगेश सागर, आमदार कालिदास कोळंबकर, मनिषा चौधरी, सुनिल राणे, राहुल नार्वेकर, मिहिर कोटेजा, पराग शहा आदि मान्यवर उपस्थित होते
राज्यपालांनी तात्काळ मुख्य सचिव संजय कुमार यांना दूरध्वनी करून, कोकणात गणेशोत्वासाठी जाणा-या चाकरमान्यांना त्रास होता कामा नये याची काळजी घ्या. तसेच चाकरमान्यांची तपासणी असेल किंवा त्यांना गावात क्वांरटाईन करावयाचे असेल तसेच गावातील ग्रामस्थांना कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी सरकार व जिल्हा प्रशासन यांनी नीट समन्वय साधत कार्यवाही करण्याचे निर्देश राज्यपालांनी मुख्य सचिवांना दिले.
गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर मुंबई ठाण्यातून चाकरमानी आपापल्या गावी जात असतो. आज १४ दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय हा चाकरमान्यांवर अन्याय करणारा आहे, असे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. अगोदरच कोरोनामुळे चाकरमान्यांचे आर्थिक कंबरडे मोडलेले आहे. त्यातच त्यांचे हातावर पोट असल्याने १४ दिवस क्वारंटाईन राहणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे. यामुळे तपासणी यंत्रणा सक्षम करून क्वारंटाईन कालावधी कमी करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

खाजगी बसेस कडून लूटमार….

एसटी सेवा वेळेत उपलब्ध न केल्यामुळे खासगी बसेसकडून मोठ्या प्रमाणावर कोकणवासीय चाकरमान्यांची लूटमार होत असल्याचे दरेकर यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. सरकारच्या निष्क्रियतेचा पाढा विरोधी पक्ष नेत्यांनी राज्यपालांसमोर वाचला. चाकरमान्यांबरोबरच गावातील ग्रामस्थांना प्रादुर्भाव होणार नाही याकरिताही नियोजन करून त्यांनाही दिलासा द्यावा, अशीही राज्यपालांकडे विनंती केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *