वादग्रस्त आयपीएस अधिकारी परमबीरसिंह निलंबित
वादग्रस्त आयपीएस अधिकारी परमबीरसिंह निलंबित..
मुंबई, दि. २ डिसेंबर:
वरिष्ठ आयपीएस अधिकारी व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. गृहमंत्र्यांवरच १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहून त्यांनी खळबळ माजवली होती. त्यानंतर ते सहा महिने गायब होते. अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अंटिलिया घरासमोर स्फोटके ठेवण्याचे प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरण व त्यानंतर १०० कोटी वसुलीच्या आरोपाचा पत्रप्रपंच यातून अनेक वादग्रस्त मालिका होत राहिल्या. परमवीरसिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून बदली करण्यात आली होती. त्यानंतर अनेक चौकशी, व तक्रारींचा समेमिरा त्यांच्यामागे लागला होता. रजेवर जाते सांगून ते गायब झाले. राज्य सरकारने चौकशीचा फास आवळत अजामीनपात्र वारंट काढले व नंतर न्यायालयाच्या निर्देशाने त्यांना फरार घोषीत करण्यात आले.
अटकेच्या भितीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असती त्यांना न्यायालयाने तात्पुरता दिलासा आहे. ६ डिसेंबरपर्यंत अटक करु नये पण चौकशीत सहकार्य करावे असे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिल्यानंतर ते मुंबईत आले. त्यांच्या आरोपामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला व सध्या ते जेलमध्ये आहेत.
परमवीरसिंह यांच्यावर खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यात विविध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यासाठी ते पोलीस स्टेशनच्या चकरा मारत आहेत.
