संपूर्ण लसीकरणासह ६०० मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता निर्माण होणार

0
IMG-20211112-WA0064

संपूर्ण लसीकरणासह ६०० मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता निर्माण होणार..

नाशिक, दि. 13 नोव्हेंबर

गेल्या दोन महिन्यात हजाराच्या घरात असलेली रूग्णसंख्या नवरात्र, दसरा दिवाळी नंतरही ४०० च्या आसपास स्थिर असून हे चांगले संकेत असून यात जिल्ह्यातील राबवलेल्या लसीकरण मोहिमेचा मोठा परिणाम आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यात संपूर्ण लसीकरणासह ६०० मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता निर्माण होणार आहे. तसेच लसीकरणासाठी कठोर उपाययोजना करण्याची इच्छा नाही. परंतु जनतेने सहकार्य न केल्यास तशी पावले उचलावी लागतील, त्यामुळे जनतेने स्वत:हुन पुढाकार घेण्यासह प्रशासनाने ही मोहीम घरोघरी पोहोचवावी असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री भुजबळ म्हणाले, ११ सप्टेंबर २०२१ रोजी रूग्णसंख्या ९०४ इतकी होती. २३ सप्टेंबर २०२१ रोजी ती १ हजार ३५ झाली. २४ ऑक्टोबरला रूग्णसंख्या ७१७ होती, त्यानंतर ही संख्या ६५० ते ७०० च्या दरम्यान असायची ती कमीकमी होत आज रोजी ४६१ पर्यंत कमी झालीय. सण, उत्सवांच्या कालावधीनंतरची ही कमी होणारी आकडेवारी चांगले संकेत देणारी व कोरोनामुक्तीसाठी आशादायक चित्र निर्माण करणारी आहे. अर्थात यांत जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणीकरण होत असलेले लसीकरणाचा मोठा वाटा आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यात संपूर्ण लसीकरणाला गती देण्यासाठी औरंगाबादसारख्या कुठल्याही कठोर उपाययोजना राबवण्याची शासन प्रशासनाची इच्छा नसून मात्र जनतेने सहकार्य न केल्यास नाईलाजास्तव त्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. त्यासाठी जनतेने स्वतः पुढाकार घेवून या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून देण्याचे आवाहन करताना ग्रामीण व आदिवासी बहुल भागात घरोघरी लसीकरण पोहोचविण्याकरिता प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी आरोग्य प्रशासनाला दिले आहेत.

जिल्ह्यात कोरोनापूर्वी ८ मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता होती. ती दुसऱ्या लाटेत १३८ ते १४० मेट्रिक टन इतकी झाली, आज ३५६ मेट्रिक टन इतकी आहे. येणाऱ्या काही दिवसात ती ६०० मेट्रिक टन इतकी होणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. जिल्ह्यात पहिल्या व दुसऱ्यासह १८ वर्षावरील ४९ लाख लसवंत असून त्यात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या ३५ लाख ४८ हजार (६८.५६ टक्के) इतकी असून दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या १३ लाख ५२ हजार (२६.१३ टक्के) इतकी आहे. येणाऱ्या काळात हे लसीकरण १८ वर्षाच्यावरील संपूर्ण लोकांचे करण्यावर भर देण्याच्याही सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी देल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *