‘नियो मेट्रो’ प्रकल्प यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार.
‘नियो मेट्रो’ प्रकल्प यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार.
सिटीलिंक नाशिक शहर बससेवेचा लोकार्पण सोहळा संपन्न.
नाशिक, दि. 10 जुलै :
निसर्गरम्य असलेल्या नाशिक शहराला प्रदूषण मुक्त ठेऊन शहराचे हवामान संतुलीत ठेवण्यासाठी आणि नाशिकच्या सर्वांगीण विकासाकरिता सदैव कटीबध्द राहणार आहोत. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये मेडीकल हब, पर्यटन हब, आयटीपार्क, वायनरी सारखे प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच दळणवळणाच्या विकासासाठी’नियो मेट्रो’ प्रकल्पासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येऊन प्रकल्प यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार असे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
महानगरपालिकेने सुरु केलेली सिटीलिंक नाशिक शहर बससेवेत आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले असल्याने नक्कीच नाशिककरांना प्रवास करतांना त्याचा लाभ होणार आहे. परंतु सिटीलिंक बससेवा यशस्वी होण्यासाठी योग्य ते नियोजन महानगरपालिकेने करावे. महानगरपालिकेने एकूण 250 बस कार्यान्वित केल्या असून त्यामध्ये 200 बस सीएनजी असून 50 बसेस डिझेलवरील आहेत. परंतु येणाऱ्या काळात प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण विरहीत इलेक्ट्रीक बससेवा सुरु करण्यात यावी, असेही यावेळी सांगितले.
कोरोनाच्या संकटाचा सामना नाशिक जिल्ह्याने अत्यंत संयमाने केला असून या कठीण प्रसंगी शासन व प्रशासनाच्या योग्य नियोजन व मेहनतीने कोरोनाला नियंत्रणात आणण्यात यश मिळाले आहे. तसेच शासन व प्रशासन संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने येणाऱ्या नवीन आवाहनासाठी सज्ज आहे
‘नियो मेट्रो’प्रकल्पासाठी पाठपुरावा करणार : देवेंद्र फडणवीस
नाशिकचे नियो मेट्रो प्रकल्पाचे मॉडेल देशातील ग्लोबल मॉडेल म्हणून विकसित करण्यात येत असून प्रकल्पाचे काम गतीने होण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच नाशिक शहराला प्रदूषण विरहीत बससेवा देण्यासाठी 50 इलेक्ट्रीक बसच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात येईल, असे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नाशिक महानगरपालिकेने सुरु केलेली आधुनिक सिटीलिंक नाशिक शहर बससेवा प्रवाशांना नक्कीच सोयीची व आरामदायी होणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
कार्यक्रमापूर्वी रिमोटद्वारे सिटीलिंक नाशिक शहर बससेवेच्या कोनशिला, सिटीलिंक नाशिक शहर बससेवेच्या लोगोचे तसेच मोबाईल ॲप, संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. तसेच महापौर सतीष कुलकर्णी यांनी ‘जलनिती अभियान’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
