ओबीसी आरक्षणासाठी एक लाख कार्यकर्त्यांचे जेलभरो !

0
20210414_115544

ओबीसी आरक्षणासाठी एक लाख कार्यकर्त्यांचे जेलभरो !

मुंबई, २४ जून :
महाविकास आघाडी सरकारच्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले याचा निषेध करण्यासाठी आणि हे आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शनिवार २६ जून रोजी राज्यातील किमान एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन करणार असून पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह एक लाख कार्यकर्ते अटक करून घेणार आहेत, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आंदोलनांना भाजपा सक्रिय पाठिंबा देईल आणि पक्षाचे कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी होतील असे पक्षाने यापूर्वीच जाहीर केले आहे. ओबीसींना पुन्हा आऱक्षण मिळण्यासाठी तातडीने करायचे काम महाविकास आघाडी सरकार करत नाही. याच्या निषेधार्ध भाजपा राज्यव्यापी आंदोलन करणार आहे.

राज्यामध्ये २६ जून रोजी किमान एक हजार ठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते चक्काजाम आंदोलन करतील. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपूर येथे तर आपण स्वतः कोल्हापूर येथे आंदोलनात सहभागी होऊ. भाजपा केंद्रीय सचिव पंकजा मुंडे पुणे येथे आंदोलनात सहभागी होतील. राज्यभरात एक लाख कार्यकर्ते अटक करून घेतील. ओबीसींचे आरक्षण रद्द झाले असताना पाच जिल्हा परिषदा व त्यांच्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या जागांची पोटनिवडणूक जाहीर करून जखमेवर मीठ चोळले आहे. ही निवडणूक रद्द करा या मागणीसाठी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. तसेच मा. पंकजा मुंडे या विषयात उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. ओबीसींचे आरक्षण पुन्हा लागू होईपर्यंत आम्ही या निवडणुका होऊ देणार नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *