अधिवेशनात चर्चा टाळण्यासाठी कोरोनाचा बहाणा !

0
IMG_20210622_151554

अधिवेशनात चर्चा टाळण्यासाठी कोरोनाचा बहाणा !

मुंबई, दि. २२ जून :
राज्य सरकारने पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचेच घेण्याचा निर्णय घेतल्याने विरोधी पक्षाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. अधिवेशन येताच कोरोनाच्या बातम्या कशा काय येतात असा प्रश्न उपस्थित करून कोरोनाचा बहाणा करून अधिवेशन घ्यायचे नाही हा सरकारचा डाव आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, दोन दिवसांचे अधिवेशन म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न आहे. दोन दिवसांच्या अधिवेशनाचा निषेध करून बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. आम्ही शांत बसणार नाही. लोकशाही मूल्यांची पायमल्ली आणि लोकशाहीची मुस्कटदाबी होत असेल, तर जनतेचा आवाज आम्हाला बनावेच लागेल. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आणि मराठा समाजाचे आरक्षण गेले. ज्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत ते मोर्चे काढत आहेत आणि कोर्टात बाजू मांडत नाहीत.त्यामुळे सरकार आहे की तमाशा अशी परिस्थिती जनतेला बघायला मिळत आहे.

एकीकडे हजारोंच्या उपस्थितीत राजकीय पक्षांच्या कार्यालयाचे उद्घाटन होऊ शकते,बारमध्ये कितीही लोक गेले तरी चालतात पण विधिमंडळामध्ये कोरोनाच्या भीतीने अधिवेशन घ्यायचे नाही, हा काय प्रकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची अवस्था यापूर्वी आम्ही संसदीय लोकशाहीमध्ये बघितलेली नाही. आज महाराष्ट्रासमोर प्रचंड प्रश्न आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही. पण याबद्दल चर्चा करण्यासाठी विधिमंडळाला वेळ नाही. विद्यार्थी तणावात चालले आहेत, पण सरकारला चर्चा करण्यासाठी वेळ नाही असेही फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *