राहुल गांधींना पंतप्रधानपदी पाहण्याची तरुणांची इच्छा!
राहुल गांधींना पंतप्रधानपदी पाहण्याची तरुणांची इच्छा!
मुंबई, दि. १९ जून :
देशाला आता दूरदृष्टी असलेला, सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारा, सर्वसमावेशक अशा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची गरज आहे. देशातील तरूणवर्गही राहुल गांधी यांना देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचे पाहू इच्छित आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार असून ते मनमानी पद्धतीने काम करत आहे. राहुलजी गांधी यांनी मोदी सरकारला लोकांच्या हितासाठी अनेकदा सुचना केल्या. त्या सुचना किती हितकारक होत्या त्याची जाणीव आता होत आहे. नोटबंदी, जीएसटी, कोरोनाचे संकट यावर त्यांनी विधायक सुचना केल्या पण त्याकडे मोदी सरकारने लक्ष दिले नाही त्याचा परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहेत. राहुल गांधी यांनी मांडलेली भूमिका मोदींनी स्विकारली असती तर मोठी हानी टळली असती.
खा. राहुलजी गांधींच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने विविध कार्यक्रम राबवून संकल्प दिन साजरा केला तसेच काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनच्या नुतनीकरणानंतरचा उद्घाटन सोहळा पार पडला, यावेळी पटोले बोलत होते.
नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, खाद्यतेलाची दरवाढ तसेच मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत आंदोलन करण्यात आले.राज्यभर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचा निषेध करत आंदोलन केले.
आ. झिशान सिद्दीकी यांनी अन्नधान्य वाटपाबरोबरच १० ऑक्सिजन कांन्स्ट्रेटर प्रदेश कार्यालयाकडे सुपूर्द केले. काँग्रेसचे मुख्यपत्र असलेल्या शिदोरी मासिकाच्या विशेष अंकाचे प्रकाशनही या कार्यक्रमात करण्यात आले.
