५ जूनच्या आंदोलनामुळे कोरोनाचा भडका उडाल्यास भाजपा जबाबदार !

0
20201209_211750

५ जूनच्या आंदोलनामुळे कोरोनाचा भडका उडाल्यास भाजपा जबाबदार !

मुंबई, दि. २७ मे :

मराठा आरक्षणाप्रश्नी जनतेची दिशाभूल करण्याकरिता ५ जूनला भाजप पुरस्कृत आंदोलनामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार उडाला तर त्याला सर्वस्वी सुपर स्प्रेडर भाजपा जबाबदार असेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिला आहे.

या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, भाजपची मानसिकता संघ विचारधारेप्रमाणेच आरक्षण विरोधी आहे. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे असा दिखावा करायचा आणि प्रत्यक्षात मात्र आरक्षण मिळू नये म्हणून मोहिमा चालवायच्या ही भाजपची कार्यपद्धती आहे. सर्वोच्च न्यायालयात आरक्षणविरोधी लढाई लढणारे सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन या संघटनेचे थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कनेक्शन आहे. या संस्थेतील बहुसंख्य विश्वस्त हे आरएसएसशी संबंधित असून नागपूरचेच आहेत. त्याचबरोबर भाजपाच्या संघाच्या कार्यामध्येही ते अग्रेसर असतात याचेही पुरावे समोर आले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि फडणवीस सरकार यांच्यामुळेच मराठा आरक्षणाला अडथळा निर्माण झाला हे स्पष्ट असताना भाजप जनतेची दिशाभूल करून आपल्या पापांचे खापर महाविकास आघाडीवर फोडण्याचा प्रयत्न करत आहे. याकरिता ५ जून रोजी भाजप पुरस्कृत आंदोलन केले जाणार आहे. भारतीय जनता पक्षाची ख्याती कोरोना सुपर स्प्रेडर म्हणून अगोदरच प्रस्थापीत झालेली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना पाच राज्यांच्या निवडणुकीत सत्तापिपासू वृत्तीने भाजपाने मोठमोठ्या सभा व रोड शो करून कोरोनाचा प्रसार केला त्यामुळेच देशात कोरोनाचा हाहाकार उडाला. ५ जूनच्या आंदोलनानंतर जर महाराष्ट्रात कोरोनाचा भडका उडाला तर त्याला सुपर स्प्रेडर भाजपाचे वर्तनच जबाबदार असेल असा इशारा सावंत यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *