तमाशा क्षेत्रातील सोनेरी पान हरपले..
तमाशा क्षेत्रातील सोनेरी पान हरपले..
मुंबई, दि 26 मे :
संगमनेरच्या सांस्कृतिक वारशाचा मानबिंदू राहिलेल्या ज्येष्ठ तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे मंगळवारी सायंकाळी वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. जन्मापासूनच प्रचंड खडतर आयुष्य वाट्याला आलेल्या कांताबाईंनी आपल्या जिद्दी स्वभावाच्या जोरावर अनेक संकटांवर मात करत आपल्या तमाशा फडाचे नाव राज्यभर गाजविले.
मान्यवरांची श्रद्धांजली…
ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच्या निधनामुळे तमाशा क्षेत्रातील सोनेरी पान हरपले”, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
” तमाशाचा कुठलाही वारसा नसताना त्यांनी स्वतःला मिळालेल्या कलेच्या दैवी देणगीच्या जोरावर अत्यंत परिश्रमाने तमाशा क्षेत्रात स्वतःचे नाव निर्माण केले होते. तमाशात पुरुष भूमिका सहजतेने साकारणाऱ्या कांताबईंनी महिला प्रेक्षकांना तमाशाकडे खेचून आणले. आपल्या उत्तम गायन, नृत्य आणि अभिनयातून त्यांनी तमाशाला पांढरपेशा समाजातही मानाचे स्थान मिळवून दिले होते.
तमाशा क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी महाराष्ट्र शासनातर्फे पहिला विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान करण्यात आला होता. त्यांचा वारसा पुढे नेणारे त्यांचे पुत्र रघुवीर, कन्या आणि सर्व कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे”, असेही देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आपल्या शोकभावना व्यक्त करताना म्हणाले की, कांताबाई सातारकर यांच्या रूपाने लोकनाट्य क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून गेले. लोककलेच्या क्षेत्रात त्यांनी बालपणीच पाऊल ठेवले आणि संपूर्ण आयुष्य या क्षेत्राला वाहून घेतले !
कांताबाई सातारकर यांनी उत्तम अभिनेत्री, गायिका, वगनाट्य दिग्दर्शिका, फड व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावून तमाशा क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. मराठी रंगभूमीवर स्त्रीने पुरुषी भूमिका केल्याचे उदाहरण म्हणजे कांताबाई सातारकर. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका त्यांनी साकारल्या, ज्या आजही जुन्या पिढीच्या स्मरणात आहे.
तुकाराम खेडकर हे नाव अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहे, त्यांच्यासोबत विवाहानंतर कांताबाईंनी लोककलेच्या क्षेत्रात केलेले काम अजरामर झाले. कांताबाई यांच्या प्रमुख भूमिका असलेली विविध सामाजिक आणि राजकीय विषयावरील वगनाट्य गाजली. संगमनेर शहर आणि तालुक्याच्या मातीशी त्यांनी अखेरपर्यंत आपली नाळ जोडून ठेवली.
रघुवीर खेडकर यांच्या रूपाने कांताबाई यांचा हा वारसा आज सक्षम पणे पुढे जातो आहे. कांताबाई यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
