कोर्टाचा निर्णय दुर्दैवी पण उद्रेक हा शब्दही काढू नका, संयम बाळगा !
कोर्टाचा निर्णय दुर्दैवी पण उद्रेक हा शब्दही काढू नका, संयम बाळगा !
सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यानंतर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया.
कोल्हापूर, दि. 5 मे :
सुप्रीम कोर्टाचा मराठा समाजासाठी आजचा निकाल दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाचे न भरून येणारे नुकसान झालेले आहे. परंतु उद्रेक हा शब्दही काढू नका, कोरोना आहे संयम बाळगा. कोरोनाची महामारी सुरु असताना, माणसं मरत आहेत. सध्या आपली माणसं जगली पाहिजेत याकडे लक्ष दिलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया खासदार छत्रपती संभाजीराजेंनी व्यक्त केली आहे.
संभाजीराजे पुढे म्हणतात की , ‘बहुजन समाजाला आरक्षण मिळावं अशी छत्रपती शाहू महाराजांची भूमिका होती. त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. गरीब मराठ्यांसाठीच माझा हा लढा होता. बहुजन समाजात समावेश करुन घेतलं तर जातीय मतभेद कमी होतील, विषमता कमी होईल असा माझा प्रयत्न होता. पण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असून तो मान्य करावा लागतो. पण समाजाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे.
आधीच्या सरकारनेही जोमाने बाजू मांडून हायकोर्टाच्या माध्यमातून पारित झालं होतं. या सरकारनेही जोमाने बाजू मांडली. केंद्र सरकारलाही यामध्ये आणलं होतं. जे शक्य होईल ते सर्व दोन्ही सरकारने केलं होतं. पण सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आपण जास्त काही बोलू शकत नाही. कोणी कमी पडलं असं मी म्हणणार नाही. सर्वांनी आपली बाजू चांगली मांडली आहे असंही राजे म्हणाले.
बाकीच्या राज्यातील लोकांना ५० टक्के आरक्षण देत असताना महाराष्ट्राला वेगळा निर्णय का याचं वाईट वाटतं, अशी खंतही संभाजीराजेंनी व्यक्त केली.
