फडणवीसजी, थापा मारून मोदींना श्रेय देण्याचे उद्योग थांबवा.
मोदींनी महाराष्ट्राची ऑक्सीजनची सर्व गरज भागवली हे धादांत खोटे !
फडणवीसजी, खोट्या थापा मारून मोदींना श्रेय देण्याचे उद्योग थांबवा.
मुंबई, दि. २६ एप्रिल २०२१
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांना लागणारा १७८४ मेट्रीक टन ऑक्सीजनचा सर्व पुरवठा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करत आहेत असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करून मोदींचे आभार मानले हा फडणवीस यांचा खोटारडेपणा आहे. वास्तविक पाहता जी यादी फडणवीस यांनी दाखवली त्यात बहुसंख्य महाराष्ट्राच्या कंपन्या आहेत. १२५० मेट्रीक टन ऑक्सीजन हे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील या कंपन्यांच्या माध्यमातूनच मिळवले आहे. या कंपन्या महाराष्ट्राच्या भूमीवर असल्याने त्यासाठी मोदींच्या परवानगीची गरज नाही.ही क्षमता महाराष्ट्राची स्वतःची आहे. पण हेही फडणवीस यांनी मोदींच्या नावावर खपवले आहे व सर्व श्रेय मोदींना देण्याचा खोटेपणा फडणवीसांनी केला आहे, तो थांबवावा असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना सावंत पुढे म्हणाले की, राज्यातील रुग्णसंख्या वाढल्यानंतर महाराष्ट्राची गरज जवळपास १७५० मेट्रीक टनाच्या पलिकडे गेली आहे. म्हणून महाराष्ट्राने स्वतःच्या १२५० मेट्रीक टन क्षमतेव्यतिरिक्त केंद्राकडे ५०० मेट्रीक टन अधिकच्या ऑक्सीजनचा पुरवठा इतर राज्यातून करावा अशी मागणी केली होती. केंद्राकडून त्यातील भिलाई केंद्रातून ११० मे.टन प्रति दिन, बेलारी ५० मे.टन प्रति दिन, जामनगरमधून १२५ मे.टन प्रतिदिन, व्हायजॅग येथून ६० मे. टन सरासरी केला जात आहे. आणि ऑक्सिजन एक्सप्रेसने ७ टँकरने एकदाच ११० मे.टन आणले आहे असे सावंत म्हणाले.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने १५ ते ३० एप्रिल या १५ दिवसांत एकंदर २५००० मे. टन ऑक्सिजनची आवश्यकता व्यक्त केली होती. १२५० मेट्रीक टन प्रतिदिन पकडून पंधरा दिवसात १७५०० मे.टन महाराष्ट्राची स्वतःची क्षमता होती. केंद्राला या १५ दिवसात ७५०० मे.टन म्हणजे ५०० मे.टन प्रतिदिन अॉक्सिजनचा पुरवठा करायचा होता. परंतु सध्या ३४५ मे.टन प्रति दिन इतकाच पुरवठा केंद्राकडून होत आहे. उरलेल्यासाठी वाहतुकीच्या अडचणी येत आहेत. असे असताना सर्व ऑक्सीजन पुरवला अशा थापा फडणवीस यांच्याकडून मारल्या गेल्या आहेत.
राज्यातील सत्ता गेल्यापासून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची मानसिकता अस्थिर झालेली आहे. सत्तेच्या हव्यासापोटी त्यांनी जनतेची दिशाभूल करत खोटे बोल पण रेटून बोल ही कार्यपद्धती हाती घेतली आहे. महाराष्ट्राने पाचशे मेट्रीक टन ऑक्सीजनची मागणी केली होती त्याचासुद्धा पुरवठा मोदी सरकार करु शकत नाही आणि वरून खोटे बोलून भाजपा नेते महाराष्ट्राची बदनामी करत आहेत हे दुर्दैवी असून कृपया खोटे बोलणे थांबवा ही विनंती सावंत यांनी केली आहे.
