‘पीएम केअर’मधून ऑक्सिजन प्लांटसाठी राज्याला एक पैसा मिळाला नाहीः
‘पीएम केअर’मधून ऑक्सिजन प्लांटसाठी राज्याला एक पैसा मिळाला नाहीः
मुंबई, दि. 26 एप्रिल :
केंद्र सरकारने जानेवारीमध्ये देशभरात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे जाहीर केले. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 10 प्लांट उभारण्यात येणार होते पण अद्याप केंद्र सरकारने एकाही प्लांटच्या उभारणीचे काम सुरु करणे दूरच साधी टेंडर प्रक्रियाही राबवलेली नाही. यासाठी राज्याला एक नवा पैसा मिळालेला नाही, असे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले आहे.
गांधीभवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना लोंढे म्हणाले की, पीएम केअर फंडामार्फत ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला कोणताही निधी दिला जात नाही. हे प्लांट उभारण्याचे काम केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणा-या सेंट्रल मेडिकल सप्लाय स्टोर मार्फत करण्यात येत आहे. ज्या कामासाठी एका नव्या पैशाचा निधीच मिळाला नाही त्यात भ्रष्टाचार कसा झाला? असा प्रश्न उपस्थित करून प्रसाद लाड यांना जर यात भ्रष्टाचार झाला आहे असे वाटत असेल तर तो भ्रष्टाचार केंद्र सरकारच्या पातळीवर झाला असण्याची शक्यता आहे.
या योजने अंतर्गत महाराष्ट्रात वाशिम, सातारा, हिंगोली, अहमदनगर, भंडारा, रायगड, रत्नागिरी, बुलढाणा, उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्याबाबतचे पत्र केंद्र सरकारने दिले आहे. केंद्र सरकार स्वतःच हे प्लांट उभारणार आहे. या योजने अंतर्गत देशभरात आजपर्यंत एकही ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित झाला नाही. आणि महाराष्ट्रात तर एक ही प्लांट उभारण्यास सुरुवातही झाली नाही. हे केंद्र सरकारचे अपयश आहे. ते झाकण्यासाठीच आ. लाड बेछूट आणि बिनबुडाचे आरोप करत आहेत.
केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव विनायक निपुण यांना दिल्ली उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करून पीएम केअर फंडामार्फत दिल्लीत उभारण्यात येणा-या नऊ पैकी केवळ एका ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीचे काम झाले आहे पण तो ही कार्यान्वित नाही असे सांगितले. इतर प्लांट कधी उभारले जातील याचे उत्तरही ते न्यायालयाला देऊ शकले नाहीत. हीच परिस्थिती देशभरात आहे. केंद्र सरकारने PSA प्लांट उभारणीबाबत घोषणेशिवाय काहीही केलेले नाही. कोरोनाच्या या संकटकाळात केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालया अंतर्गत येणा-या सेंट्रल मेडिकल सप्लाय स्टोरची भूमिका संशयास्पद असून या यंत्रणेच्या गलथानपणामुळे ऑक्सिजन अभावी दररोज हजारो लोकांचे बळी जात आहेत. त्यामुळे सेंट्रल मेडिकल सप्लाय स्टोरची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत अशी मागणी लोंढे यांनी केली.
