हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही NIA कडे !
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास NIA कडे !
ठाणे, दि. २४ मार्च :
मनसुख हिरेन तपास प्रकरणी महाराष्ट्र एटीएसला कोर्टाने जोरदार दणका दिला आहे. या प्रकरणाचा तपास तात्काळ थांबवून सर्व कागदपत्रे विनाविलंब एनआयएकडे सोपवण्यात यावीत, असा आदेश ठाणे सत्र न्यायालयाने दिला आहे.
या प्रकरणाचा तपास हाती घेण्याचे निर्देश एनआयएनं केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आणले असून देखील एटीएसनं या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला नव्हता. एवढंच नव्हे, तर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशांनंतर देखील एटीएसनं या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. ठाण्यातील सत्र न्यायालयानेच एटीएसला या प्रकरणाचा तपास थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाने आदेश देऊन देखील महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण हस्तांतरीत करत नसल्याची तक्रार एनआयएनं ठाणे सत्र न्यायालयात केली होती. एनआयएची ही तक्रार मान्य करत सत्र न्यायालयाने एटीएसला हे आदेश दिले आहेत.
या प्रकरणातील महत्त्वाचे आरोपी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएनं आधीच अँटिलियाबाहेर स्फोटकांची गाडी ठेवल्या प्रकरणात अटक केली आहे. आता मनसुख हिरेन प्रकरण देखील एनआयएकडे आल्यामुळे या दोन्ही प्रकरणांवर सचिन वाझेंची चौकशी करण्याचा मार्ग एनआयएसाठी मोकळा झाला आहे.
