रश्मी शुक्लांनी कोणतीही परवानगी न घेता फोन टॅप केले !

0
20201217_123854

रश्मी शुक्लांनी कोणतीही परवानगी न घेता फोन टॅप केले !

मुंबई, दि. २३ मार्च
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनी महाराष्ट्राच्या राजकारण खळबळ उडवून देणारे आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्याला प्रत्युत्तर देत फडणवीस यांचे आरोप धादांत खोटे असल्याचे म्हटले आहे. तसेच रश्मी शुक्ला यांच्या ज्या अहवालाचा दाखला फडणवीसांनी दिला तोही खोटा आहे असे राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलीक यांनी म्हटले आहे.

नवाब मलीक पुढे म्हणाले, रश्मी शुक्ला कोणतीही परवानगी न घेता ३० लोकांचे फोन टॅप करत होत्या, हा गुन्हा आहे. जेव्हा महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु होत्या तेव्हा सगळ्यांचे फोन टॅप करण्याचे काम रश्मी शुक्ला करत होत्या. भाजपाच्या एजंट या नात्याने काम करत असताना रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे फोन इंटरसेप्ट करण्याची त्यांना सवय लागली होती. ज्या अहवालाचा उल्लेख देवेंद्र फडणवीस करत आहेत त्यामध्ये कोणतीही परवानगी न घेता टॅपिंग केले होते.

फोन टॅपिंग बेकायदेशीर होते त्यामुळे रश्मी शुक्ला यांना नवीन पद निर्माण करुन तिथे बसवण्यात आले होते. पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांनी चुकीच्या पद्धतीने जनतेला माहिती देण्याचे काम केले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, गृहमंत्री यांच्या हालचालींसंबंधी त्यांनी काही पोलीस रेकॉर्ड सादर करताना याबाबत नक्की माहिती नसल्याचे सांगितले, याचा अर्थ कुठेतरी भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे नवाब मलिक म्हणाले.

फडणवीसांना सादर केलेला फोन टॅपिंगचा अहवाल माझ्याकडे आहे. कोणताही मंत्री थेट बदली करत नाही, त्यासाठी एक कमिटी आहे. कोणताही मंत्री आपल्या अधिकारात या बदल्या करु शकत नाही ही सत्य परिस्थिती आहे. खालचे अधिकारी आहेत त्यांच्या बदल्यांसाठीदेखील समिती आहे. असेही मलिक म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *